मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे X (पुर्वीचं ट्विटर) अकाउंट आज सकाळी हॅक करण्यात आले. त्यानंतर हॅकर्सनी पाकिस्तान आणि तुर्कीचे झेंडे असलेल्या पोस्ट शेअर केल्या, मात्र या पोस्ट थोड्याच वेळात काढून टाकण्यात आल्या. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने स्पष्ट केलं, की तांत्रिक पथकानं तातडीनं कारवाई करून अकाउंट रिकव्हर केलं. सध्या, अकाउंट पूर्णपणे रिस्टोअर करण्यात आलं असून सामान्यपणे काम करत आहे.
देशात हॅकिंग आणि सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ :
भारतात हॅकिंग आणि सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होत असून या प्रकरणांमुळं देशाला दरवर्षी हजारो कोटी रुपयांचं नुकसान होत आहे. 2024 मधील हॅकिंगच्या प्रमुख घटनांमध्ये वझीरएक्स क्रिप्टो एक्सचेंजवर 230 दशलक्ष डॉलर्सचा हॅक, बीएसएनएल डेटा उल्लंघन आणि स्टार हेल्थचा 7.24 टीबी डेटा लीक यांचा समावेश आहे. हे सायबर हल्ले प्रामुख्याने दूरसंचार, वित्त, आरोग्यसेवा आणि ऊर्जा क्षेत्रांना लक्ष्य करत आहेत. 2025 मध्ये एआय-संचालित घोटाळे आणि रॅन्समवेअरमध्ये आणखी वाढ होण्याची चेतावणी देण्यात आली आहे.
सायबर गुन्ह्यांची कारणं काय? :
डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ (UPI, इत्यादी), AI चा गैरवापर आणि भू-राजकीय तणाव ही सायबर गुन्ह्यांची मुख्य कारणं आहेत. म्हणून, लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. संशयास्पद लिंक्सवर क्लिक करणं टाळा, मजबूत पासवर्ड वापरा आणि ताबडतोब 1930 वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in वर फसवणुकीची तक्रार करा, असं आवाहन सरकारकडून करण्यात येतं. सरकारनं I4C आणि CERT-In द्वारे पावलं उचलली आहेत, परंतु जागरुकता वाढवणं आवश्यक आहे. हॅकर्सनी राजकारण्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशाच घटना घडल्या आहेत. त्यामुळं राजकारण्यांना त्यांचे सोशल मीडिया आणि इतर माहिती हॅकर्सपासून संरक्षित करण्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागतील.