मुंबई : मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित होणारा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा अचानक रद्द करण्यात आला आहे. सततच्या पावसामुळं मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल साचले असून, भव्य मंडप उभारण्यासही अडचणी निर्माण झाल्या. पावसाची हजेरी आणि पाण्यामुळे कारपेट अंथरून केलेले उपायही निष्फळ ठरले. अखेर पर्यायी जागा म्हणून गोरेगावमधील नेस्को सेंटर निवडण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
मेळाव्यासाठी मोठा तयारीचा रद्द आदेश
शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होण्यासाठी भव्य मंच उभारला गेला होता आणि जवळपास एक लाख खुर्च्यांची ऑर्डर देण्यात आली होती. पण सततच्या पावसामुळे मैदानात चिखल साचल्याने ती तयारी निष्फळ ठरली. पंप लावून पाणी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण याचा काही उपयोग झाला नाही. परिणामी, मेळावा नेस्को सेंटरमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
पूरग्रस्त शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन
राज्यातील पूरस्थिती गंभीर असल्यामुळे एकनाथ शिंदेंनी मेळाव्याचे स्वरूप साधेपणाचे ठेवण्याचे ठरवले. त्यांनी सांगितले की, “आम्हाला शक्तिप्रदर्शन करण्याची गरज नाही; लोकांनीच आम्हाला विजयी केले आहे. आता आमची ताकद शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरणार आहोत.” मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि इतर एमएमआर परिसरातील शिवसैनिकांना मेळाव्यास आमंत्रण देण्यात आले आहे; पण पूरग्रस्त भागातील कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीस प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांसाठी जीवनावश्यक मदत
एकनाथ शिंदेंनी स्पष्ट आदेश दिला की, “विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. जमीन वाहून गेली, पशुधनाचे नुकसान झाले, काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे. अश्रू पुसणे हीच सरकारची खरी जबाबदारी आहे.” शिवसेनेकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना २६ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट वितरीत केले जात आहेत. शिंदेंच्या मते, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवणे हेच मुख्य उद्देश आहे.












