मुंबई:
BMC Election 2025: बहुप्रतिक्षित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका पुढील वर्षी 31 जानेवारीच्या आत घेण्यात याव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे यंदाच्या दिवाळीनंतर निवडणुकांच्या प्रचाराचा धूमधडाका पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का? तर आता याचे उत्तर मिळाले असून या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचे निश्चित केले आहे. दरम्यान या दोन्ही पक्षांची औपचारिक बैठक झाली असून ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी किती जागा लढवाव्यात यासाठीचा फॉर्म्युलाही निश्चित केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या युतीची घोषणा दसरा मेळाव्यात होणार नसून दिवाळीच्या मुहुर्तावर ती होण्याची शक्यता आहे.
मराठी बहुल मतदारसंघांसाठी वेगळा फॉर्म्युला
मुंबई महापालिकेचे एकूण 227 वॉर्ड असून महापालिकेवर गेली अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे सत्ता अबाधित राहण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा पक्ष पूर्णपणे प्रयत्नशील असून त्यांनी यासाठी आपल्या चुलत भावाची म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मदत घेण्याचे ठरवले आहे.
हे दोन्ही भाऊ तब्बल 20 वर्षानंतर मराठीच्या मुद्दावरून एकत्र आल्याचे पाहायला मिळाले होते. तेव्हा पासून ठाकरे बंधूंमध्ये युती होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. आणि आता ही शक्यतासत्यात उतरली असून हे दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याचे निश्चित झाले असून दोन्ही पक्षांनी मुंबईत किती जागा लढवाव्यात हे देखील निश्चित झाल्याचे वृत्त PTI ने दिले आहे. या वृत्तानुसार, ज्या मतदारसंघांमध्ये मराठीजनांचा प्रभाव अधिक आहे त्या मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांना समसमान जागा मिळणार आहेत. या मतदारसंघांमध्ये दादर-माहिम, लालबाग-परळ-शिवडी, विक्रोळी, दिंडोशी, घाटकोपर पश्चिम, दहिसर आणि भांडुप यासारख्या मतदारसंघांचा समावेश आहे.
उर्वरीत मुंबईत कोण किती जागा लढणार ?
मराठी बहुल भाग वगळता मुंबईच्या उर्वरित मतदारसंघांसाठीचा फॉर्म्युला वेगळा असणार असून या मतदारसंघांमध्ये 60-40 चा फॉर्मुला ठरवण्यात आला असून उद्धव ठाकरेंची शिवसेना जास्त जागांवर लढणार आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या मतदारसंघांमध्ये ठाकरेंची शिवसेना 60 टक्के जागा लढेल तर मनसेकडे 40 टक्के जागां लढणार आहे. या दोन्ही फॉर्म्युलानुसार, 227 मतदारसंघांपैकी ठाकरेंची शिवसेना 147 वॉर्डांमध्ये तर राज ठाकरेंची मनसे 80 जागांवर निवडणूक लढवेल. जागा वाटपाच्या फॉर्मूलानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या स्थानिक कार्यकर्त्यांना संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. हे जागावाटप केवळ आकड्यांचे नाही, तर दोन्ही पक्षांच्या ताकद आणि प्रभावाचा विचार करून केले असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुस्लिम बहुल मतदारसंघांसाठी वेगळी भूमिका
राज ठाकरे यांच्या मनसेकडून कायमच मराठी अस्मितेवर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर दिला गेला असून गेल्या काही वर्षांत मनसे आणि राज ठाकरेंची ओळख कट्टर हिंदुत्ववादी, अशी निर्माण झाली आहे. त्यामुळेच ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मुस्लिम बहुल वॉर्डांमधील बहुतांश जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लढवणार असल्याची माहिती आहे. मनसेचा प्रभाव असलेल्या माहिम मतदारसंघातील दोन मुस्लिम बहुल वॉर्ड तसेच भायखळा आणि जोगेश्वरीचा यामध्ये समावेश आहे. असे केल्याने, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आपली सर्वसमावेशक छबी जपण्यात मदत होईल, तर मनसेलाही आपल्या मतदारांना न दुखावता मते मिळवता येतील.
राज ठाकरेंचा काँग्रेससोबत जाण्यास नकार
ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राज ठाकरेंची मनसे मविआमध्ये समाविष्ट होणार ? की उद्धव ठाकरेंची शिवसेना(उबाठा) महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? असे प्रश्न निर्माण झाले होते. याविषयी बोलताना, मनसेच्या एका नेत्याने पीटीआयशी बोलताना म्हटले, की राज ठाकरे कोणत्याही स्थितीत काँग्रेससोबत जाणार नाहीत. तर दुसरीकडे काँग्रेसनेही राज ठाकरेंच्या मनसेसोबत आपण जुळवून घेणार नाही, असे जाहीर केले आहे. यामुळे उद्धव ठाकरेंची सेना मविआतून बाहेर पडून नवी युती करताना दिसेल, असे चित्र आहे.
विधानसभा निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पदरी निराशा आल्याने दोन्ही भावांना एकत्र येणं अपरिहार्य
गत विधानसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेच्या पदरात निराशा आली होती. त्यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 95 जागांवर लढली होती, मात्र त्यांना केवळ 20 जागांवर विजय मिळाला होता. शिवसेनेच्या 30 वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात खराब कामगिरी होती. तर दुसरीकडे, मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपली ताकद टिकवून ठेवण्यासाठी आणि नव्याने आपली कामगिरी सिद्ध करण्यासाठी या दोन्ही पक्षांना एकत्र येणे अपरिहार्य झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका ही नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू राहिली आहे. 74,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट असलेली मानली जाते. तर गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून अविभाजित शिवसेनेने या महापालिकेवर सत्ता टिकवून ठेवण्यात यश मिळवले होते. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले, तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हणून ओळख मिळाली. या ऐतिहासिक फुटीनंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक असणार आहे. 2022 पासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 January 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.