दिवाळीत फटाके फोडल्याने नागपूरात तब्बल 6 ठिकाणी अग्नितांडव झाल्याची घटना घडली आहे. एका रात्रीत अनेक भागात ही घटना घडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागपूर शहरामध्ये गेल्या रात्रभरात वेगवेगळ्या ठिकाणी फटाक्यांमुळे सहा ठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याठिकाणी सर्वात मोठी आग आठ रस्ता चौक येथील रिलायन्स स्मार्ट स्टोर ला लागल्याचे निदर्शनास आले. रात्री 9 वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीत स्मार्ट स्टोरमधील सर्व साहित्य जळून खाक झाले असुन तीन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशाम दलाला आग विझवण्यात यश मिळाले. परंतु या आगीत लाखो मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
याशिवाय विविध 5 ठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर आल्या. यामध्ये कचऱ्याला आग लागणे, झाडाला आग लागणे अशा घटनांचा समावेश आहे. अग्निशमन दलाकडे या घटनानाची नोंद घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
नागपूर सह बारामतीतील फलटण रोड परिसरात भंगार गोदामालाही भीषण आग लागली. यामुळे परिसरात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये धुराचे लोट सर्वत्र पसरलेले दिसले. ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या अनेक तासांपासून ही आग वाढत होती, या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, गोदामातील मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य जळून खाक झाले या आगी चे कारण काय आग कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समोर आले नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Nalasopara Fire: नालासोपारा पूर्वेकडील गोदामांना भीषण आग, चार गोदामं जळून खाक
नालासोपारा येथे साई बाजार इमारतीमागे असलेल्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे . ही आग आटोक्यात आणण्यासाठी वसई-विरार अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. शेवटी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाला यश आले. या अग्नितांडवामुळे चार गोदामे पूर्णपणे जळून खाक झाली. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तियहानी झाली असुन अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. याठिकाणी आग लागण्याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. परंतु या आग लागल्याच्या घटना फटाक्यांमुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुण्यात देखील परिस्थिती जैसे थे
यासह पुण्यात ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विविध ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. त्यापैकी हडपसर येथे गल्ली क्रमांक १५ येथे मोकळ्या जागेत आग लागली होती. त्यानंतर वारजे, चौधरी दत्त मंदिर जवळ दुकानात आग, नरहे गाव, झील कॉलेजमागे एका इमारतीत गच्चीवर आग, काळेपडल, गजानन महाराज मंदिर जवळ गच्चीवर आग , बुधवार पेठ, दत्त मंदिर जवळ गच्चीवर आग कसबा पेठ, साततोटी पोलिस चौकीमागे , कागदीपुरा येथे एका इमारतीत चौथ्या मजल्यावर गॅलरीमध्ये आग, विमान नगर, संजय पार्क येथे नारळाच्या झाडाला आग, मांजरी खुर्द येथे रस्त्याच्या कडेला गवताला आग, भवानी पेठ क्षेञिय कार्यालय जवळ गॅलरीमध्ये जाळीला आग, नगर रस्त्यावर वडगाव शेरी, गणेश नगर येथे एका दुचाकी वाहनाला आग, धानोरी, कलवड वस्ती येथे मोकळ्या मैदानात कचरयाला आग, वारजे, तपोधाम कमानी जवळ एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर गॅलरीमध्ये आग यासारख्या विविध ठिकाणी आगीचे तांडव पाहायला मिळाले.