Raj Thackeray Social Media Post : देशातील श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणारी मुंबई महापालिकेचा निकाल काल जाहीर झाला. भाजपने उद्धव ठाकरे आणि मनसे नेते राज ठाकरे यांची युती उलथवून टाकली. भाजपने मुंबई महापालिकेतून 89 जागा मिळवल्या असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळालेल्या आहे. त्यानुषंगाने मुंबईचा महापौर कोण होणार याची प्रतीक्षा संपली असून भाजपचाच महापौर होणार असल्याचे स्पष्ट झाले.
यंदाच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढवली. मुंबई महापालिकेतून उद्धव ठाकरे यांना 165 जागांपैकी 71 जागांवर यश मिळाले असून 53 जागांवर मनसेने निवडणूक लढवली. त्यापैकी मनसेला 6 जागा मिळाल्या. आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्व नगरसेवकांचे मनापासून आभार मानले आहे.
अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई
सस्नेह जय महाराष्ट्र, सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नाही याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की. असं मनसे प्रमुख राज ठाकरे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर त्यांनी म्हंटलंय.
हे ही वाचा : भाजप नेते नितेश राणे यांनी उडवली उद्धव ठाकरे यांची खिल्ली; पेंग्विन म्हणत हसतानाचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर
आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं
पुढे ते म्हणाले, आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेसाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच. तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही. लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया. असं म्हणत राज ठाकरे यांनी पोस्ट शेअर केली.












