Ajit Pawar political career : महाराष्ट्राच्या राजकारणात आजची सकाळ सर्वात वाईट बातमी घेऊन आली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. अजितदादांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राने एक उमदं नेतृत्व गमावलं. राजकारणातील दादा म्हणून त्यांचा सर्वांनाच आदरयुक्त धाक होता. दादा हे राजकारणातील धडाडीचं व्यक्तिमत्व होतं. काका शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राजकीय धडे गिरवले. त्यांनी स्वतःची एक वेगळी आणि खास ओळख निर्माण केली. गेल्या काही वर्षात तर त्यांनी वेगळी वाट चोखंदळत त्यांचं राजकीय अस्तित्वही दाखवून दिले. परखड, रोखठोक, प्रशासनावर पकड, स्पष्टक्ते अशी ओळख असलेल्या अजित दादांची राजकीय कारकीर्द जाणून घेऊ..
अजितदादांनी १९८२ मध्ये स्थानिक राजकारणात प्रवेश करत काका शरद पवार यांच्या नेतृत्वात राजकीय धडे गिरवायला सुरुवात केली. १९९३ साली शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा अजितदादांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्यांनी वित्त, नियोजन, ऊर्जा, जलसंपदा, ग्रामीण विकास यासह अनेक खाती त्यांनी सांभाळली. त्याचवेळी शेती, सहकार आणि ग्रामीण भागाशी त्यांची मजबूत नाळ जोडल्या गेली. काकांसारखेच ते कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या कायम गरड्यात राहिले. भल्या पहाटे पासून काम करण्याची त्यांची सवय अनेकांना आश्चर्यचकीत करणारी होती. राजकारणात या पद्धतीने काम करणारे नेते फारच दुर्मिळ आहेत. दादांचा कामाचा झपाटा, उरक अनेकांना प्रेरणादायी होती.
सलग सात वेळा बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व
१९९५, १९९९, २००४, २००९ , २०१४, २०१९ आणि २०२४ असे सलग त्यांनी बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी मंत्रिमंडळात कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम केले. पाणी पुरवठा, नियोजन राज्यमंत्री, पाटबंधारे, फलोत्पादन, ग्रामीण विकास, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, पाटबंधारे मंत्री, तर राज्याचे अर्थमंत्री त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे. अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड केला. ते सातवेळा उपमुख्यमंत्री झाल्याचा दावा करण्यात येतो. ते स्वतः आपण उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड केल्याचे मिश्किल पणे म्हणायचे. त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं.
सहा वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा रचला विक्रम
अजितदादा पवार यांनी १० नोव्हेंबर २०१० मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून राजभवनावर शपथ घेतली. त्यानंतर २०१२ मध्ये अजितदादा यांनी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळी तिसऱ्यांदा ८० तास उपमुख्यमंत्री झाले. तर लगेच डिसेंबर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये चौथ्यांदा अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर २०२३ मध्ये राष्ट्रवादीतील ४० आमदारांचा एक गट घेऊन ते शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आणि पाचव्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी २०२४ मध्ये महायुती मध्ये विधानसभा निवडणुका लढवल्या आणि त्यांना प्रचंड बहुमत मिळाले.
दोन वेळा मुख्यमंत्री होण्याची संधी हुकली अन् स्वप्न अपूर्ण राहिलं
२००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष ठरला होता. काँग्रेसला कमी जागा मिळाल्या होत्या. त्या निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिल्यांदा मुख्यमंत्री होईल, असे वाटत होते. त्यावेळी संधी चालून आली होती. त्यावेळी अजितदादा मुख्यमंत्री होतील, असे सर्वाना वाटत होते. त्यांना मुख्यमंत्री करावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती, पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यावेळी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्याचा निर्णय घेतला आणि दादांची त्यावेळी मुख्यमंत्री होण्याची पहिली संधी हुकली.
त्यानंतर 2019 साली शिवसेनेने भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी करून दादांनी मुख्यमंत्रीपदाच्या दिशेने सर्वात मोठे धाडस केले होते. पण अवघ्या ८० तासांत ते सरकार कोसळले आणि दादांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे त्यावेळेसच्या तडजोडीतही दादांना मुख्यमंत्रिपद मागितल्यानंतर मिळाले असते. त्यावेळी दुसऱ्यांदा त्यांची संधी हुकली होती.












