Bacchu Kadu farmer loan waiver protest : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह विविध १७ मागण्यांसाठी माजी मंत्री बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होमपिचवर म्हणजे नागपुरातील खापरी येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेशेजारी असलेल्या मैदानावर उद्या २८ ऑक्टोबरपासून महाएल्गार आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. ‘नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही’ या उक्तीप्रमाणे कडू यांनी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी नागपूरात आंदोलनाची हाक दिली असल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत आंदोलनातून माघार घेतली जाणार नसल्याचा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.
दरम्यान, उद्या नागपूर येथे पार पडणाऱ्या महाएल्गार आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे भोसले, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, अखिल किसान सभेचे डाॅ. अजित नवले, शेतकरी नेते रविकांत तुपकर, शरद जोशी, विजय जावंधिया, विठ्ठलराव पवार यांच्यासह आदी शेतकरी नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतीमाल विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत त्याची दखल घेतली जाणार नाही. सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणावर कर्जाच्या बोज्याखाली आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी करण्याची हीच ती योग्य वेळ आहे, मात्र दुर्दैवाने सरकारला त्याचे कुठलेच भान राहीले नसल्याचे टीकास्त्र बच्चू कडू यांनी सरकारवर डागले आहे.
सध्या शेतकऱ्यांना सोयाबीन ३ हजार रुपये प्रती क्विंटल या भावाने विकावी लागत आहे. तर कापसाला ६ हजारांचा भाव देण्यात आला आहे. अतिवृष्टीने आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना असा भाव देणे म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे. सध्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट असून त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे कडू यांनी म्हटले आहे.
View this post on Instagram
मुळासोबत धोरणे बदलणे आवश्यक (Bacchu Kadu farmer loan waiver protest)
राज्यात होणार्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर मुळासोबत धोरणे बदलणे आवश्यक आहे. शेतकरी कर्जमाफीसह विविध १७ मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारले आहे. सरकारच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात येईल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या होम ग्रांऊडवर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सरकारची कोंडी करण्याचा कडू यांचा प्रयत्न असणार आहे.
मागण्यात मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार
दिल्लीच्या धर्तीवर आंदोलन छेडण्याचा कडू यांच्या प्रयत्न असणार आहे. अन्न, पाणी, ट्रक्टर, जनावरे, शेळ्या-मेंढ्या शेतकरी यामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जोपर्यंत मागण्यात मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे. अनिश्चित कालावधीसाठी हे आंदोलन चालणार असल्याने शासन आणि प्रशासनाची डोकेदुखी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.












