BJP Shiv Sena clash in municipal elections : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी सध्या रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. राज्यातील सत्तेत एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारी भाजप-शिंदे गटाने महापालिका निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. स्थानिक नेतृत्वात जागा वाटपावरून चांगलेच बिनसल्याने राज्यातील १६ महापालिकेत महायुती फिसकटली आहे. नगरपालिका नगरपरिषदांच्या निकालांमुळे खुमखुमी आल्याचा आरोप दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर केलाय. सत्तेत एकत्र असलेले मित्रपक्ष आता महापालिका निवडणुकीत एकमेकांचे शत्रू ठरलेत. मैत्रिपूर्ण लढतीची देखील आता कोणती अशा उरली नाही. एक-दोन नव्हे तर तब्बल १६ ठिकाणी भाजप-शिवसेनेची युती फिसकटलीय. दोन्ही नेत्यांची युतीसाठी अनेक जोर-बैठका काढल्या मात्र त्या असफल झाल्या अन् युतीमध्ये घटस्फोट झाला. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मालेगाव, नांदेड, अमरावती, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, जालना, पिंपरी-चिंचवड आणि लातूर या महापालिकांत शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकमेकांच्या समोर उभं टाकलेत. तर मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, नागपूर, जळगाव या महापालिकेत युती करण्यात आलीय.
हेही वाचा – पुण्यात कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर
भाजपकडून शिंदे सेनेला सन्मानपूर्वक जागा न मिळाल्याने पुण्यात युती तुटली
महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच पुण्यामध्ये भाजप आणि शिंदेसेना यांची युती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार स्थानिक नेत्यांच्या बैठका, जागांची मागणी, आणि चर्चा देखील केल्या. मात्र भाजपकडून शिंदे सेनेला सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यामुळे स्थानिक नेते नाराज झाले. भाजपकडून १५ ते १६ जागांचा प्रस्ताव शिंदे गटापुढे ठेवण्यात आला. मात्र, शिंदेसेना ३० ते ४० जागांवर ठाम होती. जागांचा तिढा सुटण्याऐवजी तो वाढत गेला आणि युतीमध्ये दरार आली. त्यानंतर शिंदे सेना स्वबळावर लढणार असल्याचे पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी सांगितलं.
छत्रपती संभाजीनगरमध्ये युती तुटण्याचे भाजप-शिंदे सेनाचे एकमेकांवर खापर
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपच्या भूमिकेमुळे युती तोडण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा मंत्री संजय शिरसाट यांनी केली. युती व्हावी, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्वत: प्रयत्न केले. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये बैठकांच्या दहा फेऱ्या झाल्या. जागा वाटपावर एकमत होईल असे वाटत असतानाच मंत्री संजय शिरसाट यांनी युती तुटल्याची घोषणा केली. शिंदे सेनेने भाजपवार विश्वासघात केल्याचा आरोप केला तर दुसरीकडे शिवसेनेमुळे युती तुटल्याचा आरोप मंत्री अतुल सावे यांनी केला. युती तुटण्याचे दोन्ही पक्षाने एकमेकांवर खापर फोडलं.
नांदेडमध्ये शिंदे सेनेचा अजित दादांच्या राष्ट्रवादीसोबत घरोबा
नांदेड महापालिकेसाठी भाजपा- शिंदे गटाची युती फिस्कटली आहे. नांदेड महानगरपालिकेत भाजप सर्व जागांवर स्वतंत्र लढणार आहे. तर शिंदे सेनेने अजित दादांच्या राष्ट्रवादीसोबत घरोबा गेलाय. शिंदे यांची शिवसेना 40 जागा अजित पवारांची राष्ट्रवादी जागांवर लढणार असल्याचे समोर आले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या दोन वेगवेगळ्या भूमिका, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर स्वतंत्र लढणार तर नांदेड दक्षिणचे आमदार आनंद बोंढारकर व हेमंत पाटील दादांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत.
अमरावतीत शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवणार
अमरावतीत शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. सर्व 87 जागेसाठी एबी फॉर्म वाटप करण्यात आले आहेत. अमरावती महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये सन्मानजगक जागा न मिळाल्याने शिवसेना शिंदे गट महायुती मधून बाहेर पडला असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण 87 जागा शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढत आहे. उर्वरित ठिकाणी भाजपने शिंदे गटाला शेवटच्या क्षणापर्यंत अडकून ठेवले आणि ऐनवेळी युती तुटल्याचे जाहीर केले. यामुळे शिंदे गटाची मोठी गोची झाल्याचे समोर आले. पुण्यात तर भाजपने शिंदे गटाला काही दाद दिली नाही, आणि अखरेच्या क्षणापर्यंत शिंदे गट वाट पाहात होता. आता १६ तारखेला समजेल कोण किती पाण्यात आहे.












