BMC election 2025 : बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. दोन्ही ठाकरे विरोधकांच्या ठिकऱ्या-ठिकऱ्या करतील असे खासदार संजय राऊत यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे येऊ घातलेली मुंबई महापालिका निवडणुक दोन्ही ठाकरे बंधु एकत्र लढणार हे निश्चित मानले जात आहे. त्या अनुषंगाने ठाकरे बंधुनी बैठका, मोर्चे, मेळावे आदी गोष्टींकडे लक्ष केंद्रीत केले असून शिवसेना ठाकरे पक्षाचा आज मुंबईत ‘निर्धार मेळावा‘ आयोजित करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे शिवसैनिकांना या निर्धार मेळाव्यातून काय संबोधित करणार आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने सर्वच राजकीय पक्षांना या महानगरपालिकेच्या चाव्या आपल्या हातात हव्या आहेत. निवडणुकींना आणखी काही दिवासांचा कालावधी बाकी असला तरी सर्व राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यापुढे आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे आव्हान असेल तर इकडे भाजप-शिंदेची शिवसेना बीएमसी आपल्याकडे खेचून घेण्यासाठी सर्व तयारी निशी कामाला लागली आहे. आरोप-प्रत्यारोप फैरी झाडण्यास सुरुवात झाली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आपल्या ठाकरी तोफा कोणावर डागणार याकडे लक्ष लागले आहे.
निर्धार मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्याचा
“निर्धार मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्याचा, निर्धार मुंबई महानगरपालिकेवर एकजुटीने भगवा फडकविण्याचा” या शिर्षकाखाली शिवसेनेकडून ट्रेलर लाॅन्च करण्यात आले आहे. त्यामुळे एक गोष्ट तर स्पष्ट आहे शिवसेनेचा हा मेळावा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला आहे. गेली वीस वर्ष बीएमसीची सत्ता शिवसेनेच्या हातामध्ये आहे. ती आपल्याच हाती राहावी या जोमानेच शिवसेना पुन्हा एकदा मैदानात उतरेल. तर दुसरीकडे शिवसेनेचा हा आभद्य गड खालसा करण्यासाठी भाजपची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व टिम कामाला लागली लागली आहे.
निर्धार मेळावा
संकल्प विजयाचा,
मुंबई जिंकण्याचा!सोमवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२५ । सांय ५:०० वाजता
ठिकाण: एन. एस. सी. आय. डोम, वरळी, मुंबई. pic.twitter.com/LTuktoAQ49— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 27, 2025
जिल्ह्याजिल्ह्यातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक मुंबईत येतील (BMC election 2025)
“निवडणूक आयोगाविरोधात एक नोव्हेंबरला मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा सर्वपक्षीय विरोधकांनी केली आहे. निवडणूक आयोग विरोधकांचे आक्षेप गांभिर्याने घेत नाही. घुसखोर मतदारांना यादीतून बाहेर काढणे, ही लोकशाहीची गरज आहे. निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविरोधात मोर्चा काढला जाईल. जिल्ह्याजिल्ह्यातून मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक मुंबईत येतील,” असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी म्हटले आहे.
सत्याचा मोर्चा” नाही, खऱ्या मतदारांची लढाई
संविधान वाचवा, लोकशाही जागवा.. “सत्याचा मोर्चा” नाही, खऱ्या मतदारांची लढाई असे ट्विट मनसेच्या अधिकृत एक्स या सोशल मिडियावर पोस्टर प्रसिद्ध केले आहे. खोट्या मतदार यादी विरोधात या भव्य मोर्च्यात सर्व खऱ्या मतदारांनी शनिवार दि. १ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रीट, चर्चगेट, मुंबई येथे जमण्याचे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाची चुकीची कार्यप्रणाली जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. मतदरांचा रोष १ नोव्हेंबरच्या मोर्चात दिसू द्या. मोर्चाला येताना सर्वाजनिक वाहतुकीचा वापर करा. निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शक लोकांपुढे मांडा अशी सूचना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.












