Devendra Fadnavis emotional post : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून बारामती जात असताना अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनानं राजकीय नेत्यांसह संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातच नाही तर राजकारणात देखील मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या या एक्सिटमुळे अनेक राजकीय नेत्यांना धक्का बसला असून महाराष्ट्रासाठी देखील ही न पचणारी बाब आहे. रोखठोक बोलणारं एक व्यक्तिमत्व, धडाडीचा मित्र गमावल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री देखील जवळचा मित्र गमावल्याचे दुःख सहन करू शकले नाही. त्यांनी त्यांच्या शोक भावना व्यक्त करत एका लेखाच्या माध्यमातून भावनांना वाट मोकळी करून दिली.
विनाशकारी भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मित्र, सहकारी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल पोस्ट आणि लेख लिहीत भावना व्यक्त केल्या आहे. दादा आता नाहीत ! माझे प्रिय मित्र आणि सहकारी, एक मजबूत जनसंपर्क असलेले लोकनेते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. ही एक अत्यंत धक्कादायक, हृदयद्रावक बातमी आहे. मी सुन्न झालो आहे. या विनाशकारी भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. असं ते या लेखात म्हणाले आहे.
विशाल हृदयाचा धाडसी मित्र गमावला
मी माझा विशाल हृदयाचा धाडसी मित्र गमावला आहे. हे माझ्यासाठी एक दुःखद आणि वैयक्तिक नुकसान आहे. आणि हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे! प्रिय दादांना मी माझे मनापासून, नम्र, मनापासून आदरांजली वाहतो. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुटुंबाला माझी मनापासून श्रद्धांजली. दुःखाच्या आणि कठीण काळात आम्ही त्यांच्यासोबत आहोत. या अपघातात आणखी ४ जणांना जीव गमवावा लागला. त्यांच्या कुटुंबियांनाही माझी संवेदना. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. अशी पोस्ट लिहीत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
कसा घडला अपघात
आज बारामतीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार यांच्या 4 सभा होत्या. या सभेसाठीच मुंबईतील सर्व कामे उरकून दादा बारामतीला निघाले होते. बारामनातीत लँडिंग करतानाच 8 वाजून 46 मिनिटांनी त्यांच्या विमानाचा अपघात घडला. हा अपघात बारामती एअरपोर्टहून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर घडला. ऐनवेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान धावपट्टीवर लँड करता आले नाही. तर हे विमान एअरपोर्ट पासून 2 ते 3 किलोमीटर लांब जमिनीवर उतरवण्यात आले. ज्या ठिकाणी हे विमान कोसळले त्या ठिकाणी खोलगट असा भाग होता. या जागेच्या आजूबाजूला झाडे, झुडपे आणि ऊस शेती होती. आणि त्याशेजारी वस्ती होती.
तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकांचे विमानावरचं नियंत्रण सुटलं
लियरजेट 45 XR या विमानाने उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई येथून बारामतीत जाण्यासाठी निघाले होते. या विमानात अजित पवार यांच्यासह विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक हे देखील होते. सकाळी 8.40 मिनिटांनी विमान बारामती एअरस्ट्रीपच्या जवळ होते. परंतु त्याचवेळी विमानात तांत्रिक बिघाड झाला. 8.46 मिनिटांनी तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकांचे विमानावरचं नियंत्रण सुटलं. आणि विमान जमिनीवर कोसळलं. विमान जमिनीवर कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. आणि त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले अन विमानाला भीषण आग लागली. विमानाचा पूर्णपणे जळून कोळसा झाल्याचं यावेळी बघायला मिळालं.
घड्याळ हीच ठरली शेवटची ओळख
हा अपघात घडल्यानंतर विमानाचा पूर्णपणे कोळसा झाला. या अपघातात मृतदेहांची ओळख पटवणे अशक्य होते. त्यावेळी अजित पवार यांचा मृतदेहाची ओळख पटवणे देखील मुश्किल होते. परंतु त्यांच्या मनगटावर असलेल्या घड्याळाने त्यांची ओळख पटवून देण्यास मदत केली. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष जेव्हा विभागला गेला. तेव्हा अजित पवार यांच्या वाट्याला घड्याळ हेच चिन्ह आले होते. आणि आज जेव्हा दुर्दैवी घटना घडली तेव्हा त्यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या मनगटावरील घड्याळाने पटली. शेवटी घड्याळ हीच त्यांची शेवटची ओळख ठरली.
काही वेळात अजित दादा अनंतात विलीन होणार आहे. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांचे पार्थिव बारामतीमध्ये असलेल्या काटेवाडी याठिकाणी असलेल्या त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ वाजेपर्यंत पार्थिव काटेवाडी येथे ठेवण्यात येईल. सकाळी ९ वाजता काटेवाडी येथून अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. आणि तिथून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्ययात्रा समाप्त होईल. या पार्श्वभूमीवर त्यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यानंतर 11 वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवार यांना शेवटचा निरोप दिला जाईल.












