Rahul Gandhi : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं लखनऊ विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरुद्ध केलेल्या अपमानजनक वक्तव्याशी संबंधित प्रकरणासंदर्भात ते आज सुलतानपूर येथील खासदार/आमदार न्यायालयात हजर राहणार आहेत. राहुल गांधी लखनऊ इथं येताच काँग्रेस नेत्यांनी निवेदनं जारी केली आहेत.
आम्हाला न्याय मिळेल – प्रमोद तिवारी :
सुलतानपूर येथील खासदार/आमदार न्यायालयात राहुल गांधी यांच्या हजेरीवर काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तिवारी म्हणाले की, भाजपा देशभरात त्यांच्याविरुद्ध सतत खोटं आणि बनावट खटले दाखल करत आहे. त्याचप्रमाणे सुलतानपूरमध्येही खटला दाखल करण्यात आला आहे. ते पुढं म्हणाले, “आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आम्हाला न्याय मिळेल. ते (राहुल गांधी) आज त्या प्रकरणात हजर राहण्यासाठी येत आहेत.”
राहुल गांधींना स्वतः न्यायालयात हजर राहावं लागेल – अजय राय :
या प्रकरणाबाबत उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय म्हणाले, “राहुल गांधींचा सुलतानपूरमध्ये कार्यक्रम आहे, म्हणून त्यांना तिथं जावं लागेल आणि त्यांना स्वतः न्यायालयात हजर राहावं लागेल. ते त्यासाठी येत आहेत.”
अमित शहा यांनी दाखल केला मानहानीचा खटला :
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल 2018 मध्ये राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. 4 ऑगस्ट 2018 रोजी उत्तर प्रदेशातील सुलतानपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला होता. कर्नाटक निवडणुकीपूर्वी बेंगळुरुमध्ये एका निवडणूक रॅलीदरम्यान राहुल गांधींनी ही टिप्पणी केल्याचा आरोप आहे.









