मुंबई : मागील महिन्यात दहीहंडीच्या निमित्तानं ठाण्यातील टेंभीनाका परिसरात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघंजण एका मंचावर आले होते. त्यावेळी भाजपा व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा-शिवसेना एकच असल्याचं सांगत एकोप्याचं दर्शनही घडवलं. त्यामुळं येत्या काळात ठाण्यातील भाजपा व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सुरु असलेली गटबाजी थांबेल, असं सर्वांनाच वाटत होतं. मात्र, भाजपाचे ज्येष्ठ नेते व वनमंत्री गणेश नाईक यांनी आगामी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनता दरबारची मोहीम सुरुच ठेवली आहे. त्यामुळं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ठाणे दौऱ्यानंतरही गणेश नाईक यांनी या एकोप्याच्या संदेशाकडे दुर्लक्ष केलं आहे. यामुळं एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात महायुतीत ऑल इज वेल नसल्याचं दिसत आहे. परिणामी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भाजपानंच आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे. संपुर्ण राज्यात अशी परिस्थिती असली तरी मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मात्र हा संघर्ष मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
राज्यात तसंच खासकरुन महायुतीमध्ये ठाण्यावरुन नेहमीच रस्सीखेच दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात मोहीमच उघडली आहे. ठाणे व नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यसमोर ठेवून गणेश नाईक यांनी ठाण्यात सर्वत्र जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला आहे. त्यासाठी ठाण्यात बैठका घेऊन अधिकाऱ्याना सूचना देत आहेत. त्यामुळं महायुतीमधील मित्र पक्ष नाराज झाले आहेत. नाईक यांची ‘एकला चलो’ची भूमिका पाहून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबाराचं ठिकाण बदलून ठाण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या राम गणेश गडकरी सभागृहात गणेश नाईक यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी नाईक यांच्यावर ‘साठी बुद्धी नाठी’ अशी केलेली टीका गणेश नाईक यांच्या चांगलीच जिव्हारी लागलेल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळंच नाईक यांनी ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी जनता दरबार आयोजित करुन एकनाथ शिंदेंची कोंडी केली. पालघर येथील एका कार्यक्रमावेळी ‘एकनाथ शिंदे यांना गेल्या अडीच वर्षाच्या कारकीर्दीत मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली होती. पण मिळालेलं टिकवता यायला हवं’, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळंच त्या वक्तव्याचा समाचार घेतानाच खासदार म्हस्के यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यामुळं गेल्या काही दिवसापांसून भाजपा व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद चव्हाटयावर आला आहे.
त्यातच दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगली होती. नाराज असल्याची चर्चा होत असतानाच दहीहंडीच्या निमित्तानं ठाण्यातील टेंभीनाका परिसरात सीएम फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेजण एकत्रित आले होते. त्यावेळी भाजपा व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वादावर पडदा टाकताना भाजपा-शिवसेना एकच असल्याचं सांगत एकोप्याचं दर्शनही घडवलं होतं. मात्र नेते एकत्र आले तरी ठाण्यातील दोन्ही पक्षाचे एकत्रीत दिसत नाहीत. सीएम फडणवीस यांच्या ठाणे येथील दौऱ्यानंतर भाजपा व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी दरी जाणवत आहे.
आगामी काळात होत असलेल्या महापालिका निवडणुका दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळं दोन्ही पक्षांत मनोमिलन होण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करीत आगामी निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष ‘एकला चलो’च्या भूमिकेत दिसत आहेत.