Ladki Bahin Scheme While Farmers Suffer : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. ही योजना जाहीर झाल्यापासून विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत. तसेच विविध दावे करत आहेत. असं असलं तरी ही योजना सुरूच राहणार असल्याची ग्वाही सातत्यानं महायुती सरकारकडून दिली जातेय. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात. या योजनेसाठी विविध खात्यांचा निधी वळवण्यात आल्याचा आरोपही अनेकवेळा करण्यात आलाय. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या नादात बळीराजाला मरणाच्या दारात ढकललं जातंय का असा सवाल उपस्थित होतोय.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी वळवल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आलाय आणि याचा फटका शेतकरी अनुदानाला बसतोय. यामुळे शेतकरी अनुदानामध्ये विलंब होणं, कर्जमाफीच्या प्रक्रियेत जाचक अटी निर्माण करणं आणि शेतीसाठीच्या अनुदानात कपात होण्याची भीती यांसारख्या समस्या उद्भवल्या आहेत. लाडकी बहीण’ आणि अन्य लोकप्रिय योजनांसाठी सरकारने तिजोरीतून मोठा निधी वळवला आहे. यामुळे नियमित शेतकरी अनुदान आणि काही योजनांच्या पूर्ततेमध्ये विलंब झाल्याच्या तक्रारी विविध शेतकरी संघटनांनी केल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेमुळे ठिबक सिंचन अनुदान थकलं
नमो शेतकरी महासन्मान निधी किंवा इतर शेतकरी कल्याणकारी योजनांचा लाभ घेताना, जर पती-पत्नी दोन्ही लाभार्थी असतील, तर योजनेच्या नियमांनुसार एकाच कुटुंबातून लाभ घेण्याबाबत अडचणी येत आहेत. राज्याच्या अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त भार पडल्याने, शेतकरी संघटनांचे नेते राजू शेट्टी आणि कायदेतज्ज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी आणि या योजनेच्या अटींचा फटका शेतकऱ्यांना बसू नये, अशी आग्रही मागणी वेळोवेळी करण्यात आलीय. लाडकी बहीण योजनेमुळे मराठवाड्यात ठिबक सिंचनाचं अनुदान थकलंय.
निधी मिळत नाही मग शेतकऱ्यांना पैसे कुठून द्यायचे
त्यामुळे बळीराजाच्या खिशाला चांगलाच फटका बसतोय. मराठवाड्यात शेतकऱ्यांना मिळणारे ठिबक सिंचनचं अनुदान थांबवलं गेलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये ५ कोटी ६० लाख रुपयांचं अनुदान थकलंय. निधी मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे कुठून द्यायचे, असा प्रश्न कृषी विभागासमोर आहे. फक्त संभाजी नगरमध्येच ५ कोटींपेक्षाही जस्त अनुदान थकलं आहे. अनेक शेतकऱ्यांनी स्वतः चे पैसे खर्च करुन ठिबक सिंचन बसवलंय. मात्र,अजूनही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींमुळे बळीराजाला देखील फटका बसला आहे.
अंतिम पडताळणीत अपात्र महिलांची संख्या कमी
महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. आरोग्य, कल्याण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी पात्र महिलांना दरमहा १५००रुपये दिले जातात. एका माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, जुलै २०२४ ते जून २०२५ या काळात या योजनेसाठी ४३ हजार कोटी इतका विक्रमी खर्च करण्यात आला आहे.. सुरुवातीला या योजनेसाठी प्रतिमहिना मोठा निधी लागत होता. मात्र, अंतिम पडताळणीत अपात्र महिलांची संख्या कमी झाल्यामुळे खर्चात बचत झाली आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी राज्य सरकारने या योजनेसाठी २६,५०० कोटींची तरतूद केली आहे.











