Ichalkaranji municipal election BJP Shiv Sena : इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत नवनवीन राजकीय घडामोडी समोर येत असून भाजप-शिवसेना युतीत उमेदवारीवरून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. प्रभाग क्रमांक 1 ते 16 साठी उमेदवारांची नावे सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली होती. मात्र या घोषणेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून नव्याने उमेदवारी जाहीर करण्यासाठी २८ तारखेला रविवारी मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली.
कार्यकर्त्यांनी थेट राजीनामे दिले
इचलकरंजी महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वच पक्षांमध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली. भाजप व शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या तसेच अर्ज मागविण्यात आले होते.त्यानंतर काही इच्छुकांना फोन करून प्रचाराला सुरुवात करण्याचे संकेत देण्यात आले होते.मात्र यामध्ये अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याने भाजपमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटला.काही ठिकाणी आंदोलन, तर काही ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. तर काही कार्यकर्त्यांनी थेट राजीनामे दिले.
हे ही वाचा : आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आज भरणार उमेदवारी अर्ज; लढवणार महापालिका निवडणूक
भाजपमध्ये गेली ३० ते ४० वर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अवाडे-हाळवणकर गट एकत्र आल्याने नेत्यांसमोर उमेदवारी देण्याचा पेच निर्माण झाला. मात्र भाजपशी पूर्वी कधीही संबंध नसलेल्या आणि अलिकडेच पक्षात प्रवेश केलेल्या काही जणांना उमेदवारी दिल्याने असंतोष अधिकच वाढला.
२८ तारखेला मुंबईत पुन्हा बैठक
या सर्व प्रकाराची दखल भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ तारखेला मुंबईत पुन्हा बैठक बोलावली आहे.या बैठकीत उमेदवारीवर पुनर्विचार करून नव्याने नावे जाहीर केली जाणार आहेत.या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आमदार राहुल आवाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर,माजी आमदार प्रकाश आवाडे,निरीक्षक मकरंद देशपांडे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.आता या बैठकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







