BJP’s silent Morcha : महाविकास आघाडी आणि मनसेने मतदार यादीतील घोळाच्या मुद्द्यावरून काढलेल्या ‘सत्याचा मोर्चा’ला भाजपने दक्षिण मुंबईत मूक आंदोलन करत प्रत्युत्तर दिले. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटले की, ‘ठाकरेंनी महाराष्ट्राला वाईट दिवस दाखवले’. या मूक आंदोलनात तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून भाजप नेत्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. बाबुलनाथ मंदिर ते गिरगाव चौपाटी असा हा मोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये मविआ-मनसे आघाडीवर दुटप्पी राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
‘जिंकले की लोकशाही, हरले की ईव्हीएम’ हा मविआचा पवित्रा
निवडणूक येताच संविधान, लोकशाही यांच्या नावाने भावनिक राजकारण करून लोकांची दिशाभूल करायची, हा महाविकास आघाडीचा नेहमीचाच खेळ होऊन बसला आहे. लोकसभा निवडणुकीत जेव्हा जनमताचा कौल महाविकास आघाडीला मिळाला, तेव्हा तोंडून ‘ब्र’ सुद्धा न काढणारे महाविकास आघाडीचे नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताच पुन्हा एकदा लोकांची दिशाभूल करू पाहत आहेत, असा आरोप भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.
हे ही वाचा – Satyacha Morcha : राज ठाकरेंनी दाखवला दुबार मतदारांच्या पुराव्याचा ढिगारा, आयोगावर चढवला हल्लाबोल..
“व्होट चोरी”च्या धादांत खोट्या आरोपाला निवडणूक आयोगाने पुराव्यांसह ठोस उत्तर देऊनसुद्धा वारंवार निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हा केवळ निवडणूक आयोगाचा नव्हे, तर संविधान आणि लोकशाहीचा अपमान असल्याचे चव्हाण म्हणाले.
त्यांचा असत्याचा मोर्चा…
फरक स्पष्ट आहे.. त्यांचा असत्याचा मोर्चा… खोट्या शब्दांची गर्दी … बोंबाबोंब… अपयश लपवण्याचं ढोंग त्याविरुद्ध भारतीय जनता पक्षाचा मूक मोर्चा… कारण सत्याला शब्दाची नाही तर कृतीची जोड लागत, असे भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा चित्राताई वाघ म्हणाल्या.






