NDA Bihar CM Tawde Statement : भाजपाचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी एनडीएच्या प्रचंड विजयावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, हा विजय कोणत्याही एका मोहिमेचा किंवा नवीन योजनेचा परिणाम नाही, तर गेल्या दहा वर्षांत सुरु असलेल्या विकास प्रकल्पांवर जनतेच्या आशीर्वादाचा परिणाम आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “हा विजय 10 हजार रुपयांच्या कोणत्याही घोषणेमुळं मिळाला नाही, तर बिहारमधील दीर्घकालीन योजनांवर जनतेच्या विश्वासामुळं झाला आहे.”
बिहारच्या जनतेचं विकासाला मतदान :
तावडे म्हणाले की, “बिहारच्या जनतेनं या निवडणुकीत स्पष्ट संदेश दिला आहे की त्यांना विकास हवा आहे आणि त्यावर त्यांचा विश्वास आहे. बिहारच्या जनतेनं विकासाला मान्यता दिली आहे. लोकांनी लालू आणि तेजस्वी यांच्या घोषणा मागे सोडल्या आहेत. या निवडणुकीत भावनांवर नव्हे तर विकासाच्या मुद्द्यावर मतं देण्यात आली.”
हे ही वाचा – बिहार विधानसभा निवडणूक निकाल: पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी 6 वाजता भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करणार
मुख्यमंत्रीपदाबद्दल काय म्हटलं? (NDA Bihar CM Tawde Statement)
विनोद तावडे यांना मुख्यमंत्रीपदाबद्दल विचारलं असता त्यांनी थेट उत्तर टाळलं आणि म्हटलं की, “आता विजय साजरा करा.” योग्य वेळ आल्यावर सर्व उत्तरं उघड होतील. तावडे यांच्या विधानावरुन असं सूचित होतं की एनडीएच्या मुख्यमंत्रिपदाबद्दलचा निर्णय केंद्रीय नेतृत्व आणि आघाडी यांच्यातील सल्लामसलतीनंतरच घेतला जाईल. बिहारमधील ताज्या ट्रेंडमध्ये एनडीएनं मजबूत आघाडी कायम ठेवली आहे, ज्यामुळं पाटणा येथील पक्ष कार्यालयांमध्ये जल्लोष साजरा केला जात आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आता अंतिम टप्प्यात आहे आणि ट्रेंडमध्ये एनडीएनं 200 चा आकडा ओलांडला आहे आणि मजबूत आघाडी प्रस्थापित केल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांच्या राजदचे निकाल अपेक्षेच्या विरुद्ध असल्याचं दिसून येत आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसूरज पक्षालाही कोणताही महत्त्वपूर्ण फायदा दिसून येत नाही.












