Satyacha Morcha : मुंबई पोलिसांनी महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आयोजित केलेल्या संयुक्त रॅली आणि ‘सत्याचा मोर्चा’च्या आयोजकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि बेकायदेशीर सभा आयोजित केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, दुसऱ्या बाजूला भाजपकडून काढण्यात आलेल्या मूक मोर्चाच्या आयोजकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्ष चिडीचा डाव खेळत असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसेने काढलेल्या ‘सत्याचा मोर्चा’मुळे राजकीय वातावरण तापले आहे. या मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार, बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप केले. राज ठाकरेंनी दुबार मतदारांचे पुरावे सादर करत निवडणुका एक वर्ष पुढे ढकलण्याची मागणी केली. मनसे-मविआच्या सत्याचा मोर्चाला भाजपकडून ‘मूक आंदोलना’ने उत्तर देण्यात आले.
परवानगीशिवाय मोर्चा काढण्यात आला
मुंबईत विरोधकांनी आयोजित केलेल्या ‘सत्याचा मोर्चा’मुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिलेली नव्हती, दरम्यान यापूर्वी झालेल्या मराठा आंदोलनावेळी सर्वसामान्यांना झालेल्या त्रासामुळे आणि उच्च न्यायालयाच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे पोलीस परवानगी देण्यास टाळाटाळ करत असल्याचे बोलल्या जात होते. जर परवानगीशिवाय मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला, तर आयोजकांवर कायदेशीर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे या मोर्चाचे भवितव्य काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
हे ही वाचा – BJP’s silent Morcha : ‘मविआ’- मनसेच्या सत्याच्या मोर्चाला भाजपकडून मूक मोर्चाने प्रत्युत्तर
“जिंकलो की लोकशाही आणि हरलो की मतचोरी..”
मुंबईच्या रस्त्यावर महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात जोरदार शक्तिप्रदर्शन बघायला मिळालं. मतदार याद्यांमधील घोळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला, तर भाजपने याला ‘फेक नरेटिव्ह’ म्हणत मूक आंदोलन केलं. भाजपने ‘जिंकलो की लोकशाही आणि हरलो की मतचोरी, ही विरोधकांची भूमिका आहे,’ असा थेट आरोप केला. या मोर्चाला ‘सत्याचा मोर्चा’ असं नाव देण्यात आलं असून, यात शरद पवार यांच्यासह आघाडीचे अनेक मोठे नेते सहभागी झाले होते.
‘मविआ’चं आंदोलन नौटंकी आणि असत्याचा फॅशन शो
भाजपने मविआच्या या आंदोलनाला नौटंकी आणि असत्याचा फॅशन शो म्हटलं आहे, तर दुसरीकडे मतदार याद्यांमध्ये दुरुस्तीची गरज असल्याचं मात्र मान्य केलं आहे. दोन्ही बाजूंच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले असताना आता बेकायदेशीर सभा आणि पोलिस आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल रॅली आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












