Pune Municipal Election Analysis : काल महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. मुंबई महापालिकेनंतर पुणे महापालिकांच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्याचे बघायला मिळाले. पुणे महापालिकेतून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील सदस्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. तर अनेक आजी माजी मंत्र्यांचे नातेवाईक जसे की, मुलगा–सून यांना देखील उमेदवारी मिळाली होती. त्यानुषंगाने घराणेशाही टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. काहींनी ती ही टिकवली तर काहींच्या पारड्यात मात्र अपयश आले.
तुरुंगात असलेल्या सोनाली आणि जयश्री आंदेकर विजयी
यंदाची निवडणूक फक्त आणि विकासाच्या मुद्द्यावर नसून गुन्हेगारी तसेच घराणेशाहीच्या वादाभोवती फिरताना बघायला मिळाली. पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील महिलांना राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटाकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी महापालिका निवडणूक तुरूंगातूनच लढवली. आणि विजयी देखील ठरल्या. काही महिन्यांपूर्वी आयुष कोमकर या मुलाची हत्या करण्यात आली होती. ही हत्या करणाऱ्या सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर तुरुंगात होत्या. परंतु त्यांनी तुरुंगात असूनही महापालिका निवडणूक जिंकली. रविवार पेठ नाना पेठेतील प्रभाग 23 येथून निवडणुकीला उभ्या होत्या. त्यांना निवडणुकीत यश मिळाले असून त्या विजयी ठरल्या.
जयश्री मारणे पराभूत
पुण्यातील बावधन भुसारी कॉलनीमधून प्रभाग क्रमांक 10 येथून कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याची पत्नी जयश्री मारणे यांना देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवारी दिली होती. त्यानुसार त्यांनी महापालिका निवडणूक लढवली. याशिवाय प्रभाग क्रमांक 39 मध्ये गुंड बापू नायर याना देखील उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवारांकडून देण्यात आली होती. महापालिका निवडणूक लढल्यानंतर जयश्री मारणे, बंडू आंदेकर, गुंड बापू नायर पराभूत झाले.
हे ही वाचा : अखेर चार वर्षांनी मुंबईला मिळणार नवीन महापौर; कधी होणार महापौरपदाची निवडणूक, कशी असते प्रक्रिया?
घराणेशाहीतुन यांनी लढवली निवडणूक
महापालिका निवडणुकीत घराणेशाही टिकवून ठेवण्यासाठी आजी माजी आमदार किंवा नेत्यांचे पुत्र, सून, मुलगी देखील निवडणुकीस उभे राहिल्याचे दिसले. त्यानुसार भाजपने दिवंगत आमदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट यांना उमेदवारी दिली होती. तर दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची मुलगी सायली वांजळे यासह दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक, दिवंगत आमदार विनायक निम्हण यांचे चिरंजीव सनी निम्हण, माजी राज्यमंत्री शशिकांत सुतार यांचे पुत्र पृथ्वीराज सुतार, बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजीत शिवरकर यांना उमेदवारी दिली होती. त्यानुसार काल झालेल्या निवडणुकीत स्वरदा बापट, कुणाल टिळक, सनी निम्हण हे विजयी झाले आहे.
रवींद्र धंगेकर यांचे पुत्र पराभूत
काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे, शिंदसेनेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर, उद्धव ठाकरे गटाचे महादेव बाबर यांचा मुलगा प्रसाद बाबर यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बापू पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे आणि सून ऐश्वर्या पठारे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली. त्यानुसार अभिजीत शिवरकर- सुरेंद्र पठारे, ऐश्वर्या पठारे, पृथ्वीराज सुतार, सायली वांजळे हे विजयी ठरले असून अविनाश बागवे, प्रणव धंगेकर, प्रसाद बाबर पराभूत ठरले आहेत.












