Shashikant Shinde Merger Claim : महापालिका निवडणूकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर या चर्चांना ब्रेक लागेल असे वाटत होते. मात्र, या चर्चांनी आणखी वेग घेतला आहे. येत्या १२ फेब्रवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार होते असा दावा अनेक नेत्यांनी केली आहे. तसेच याबाबत शरद पवार यांनीही अजित पवार आणि माझ्यात या विषयाची चर्चा झाली होती असं विधान केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर शंका व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी थेट अजितदादांची शपथ घेऊन, सर्व गोष्टींचा उलगडा केलाय.
शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटील यांनी देखील दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरण संदर्भात अनेक बैठका झाल्या होत्या अशी माहिती दिली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमध्ये एकत्रिकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं असं विधान करत या चर्चेवर शंका उपस्थित केली आहे. यावर शशिकांत शिंदे यांनी स्पष्टता आणण्यासाठी दादांची शपथ घेतलीय.
हेही वाचा – “६ जणांचा मृत्यू, ५ मृतदेह कसे? मनात शंकेचं काहूर, अन् प्रश्नांचा आगडोंब उसळतोय”; मिटकरी
मी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो की, एकत्र येण्याची चर्चा शंभर टक्के झाली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर प्रश्न विचारला असता शशिकांत शिंदे म्हणाले की, ‘अजित दादांचं निधन झालं नसतं तर ही चर्चा झाली की नाही हे सांगायची वेळ आली नसती. आमची बाजू अशी दाखवली जाते की आम्हीच ही चर्चा सुरू केली आणि दादा गेले त्यांच्या राजकीय परिस्थितीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण मी अजित दादांची शपथ घेऊन सांगतो, माझं आणि त्यांचं भावनिक नातं आहे. त्यांची शपथ मी खोटी घेणार नाही. ही चर्चा शंभर टक्के झाली होती, दोन्ही पक्ष एकत्र यावेत ही दादांची इच्छा होती. अजितदादा आणि पवार साहेबांची भेट झाली होती, त्यानंतर दादांना पवार साहेबांच्या उपस्थितीत हा निर्णय घ्यायचा आहे.’ असं सांगितलं होतं.
आमचे उमेदवार घड्याळ चिन्हावर कशाला उभे केले
‘अजित दादांचे भविष्यकाळातील जे अंदाज होते, आराखडे होते यावर मी जास्त काही बोलणार नाही. मला वाटत की ज्यावेळी एखादा माणूस भाविनिकतेने बोलतो, मात्र तो व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या इच्छेसाठी आम्ही भूमिका मांडली, त्यानंतर आम्हालाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न होतो हे दुर्दैव आहे. विलीनीकरणाबाबत एकदा नाही दहा ते बारा वेळा बैठका झाल्या होत्या. तसं काही नसतं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आम्ही आमचे उमेदवार घड्याळ चिन्हावर कशाला उभे केले असते. ठरलं म्हणून केले ना.
स्थानिक निवडणुकीनंतर एकत्र येण्याचा निर्णय
महानगर पालिकांच्या निवडणुकीनंतर हा निर्णय होणार होता. मात्र लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा झाली. मध्ये आठ दहा दिवसांचा वेळ मिळाला असता तर या चर्चेचा वेळ आला नसता. मात्र आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर एकत्रिकरणाचा निर्णय घ्यायचा हा निर्णय झाला होता,’ असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला आहे.












