Uddhav Thackeray emotional interview : महापालिका निवडणुकांसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अशात राज्यातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत. जुने घोटाळे, जुन्या टीका यावरही भाष्य करून भरलेल्या जखमांवरची खपली काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर काही ठिकाणी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर अनेक ठिकाणी मतदारांना भावनिक आवाहनही केलं जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीवेळी उद्धव ठाकरे हे भावुक असल्याचे समोर आलं आहे. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळल्यासारखं झालं.
थेट प्रश्न आणि उद्धव ठाकरे यांची बेधडक उत्तरे
उद्धव ठाकरे यांनी खणखणीत आणि सनसनाटी मुलाखत झाली. यावेळी थेट प्रश्न आणि उद्धव ठाकरे यांची बेधडक उत्तरे यामुळे ही मुलाखत प्रचंड गाजली. प्रश्न उत्तरांची जुगलबंदी बऱ्याच दिवसानंतर या मुलाखतीच्या निमित्ताने माध्यमांमध्ये पाहायला मिळाली. जसे रोखठोक प्रश्न विचारले, अडचणीचे प्रश्न विचारले तसेच भावनेला हात घालणारे प्रश्नही विचारले. पण उद्धव ठाकरे यांनी अत्यंत शांत आणि संयमीपणे या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. एका क्षणी तर ते हळवे झाले. त्यांच्या डोळ्यात पाणी तरळल्या सारखं दिसलं. मुलाखतकार यांनी नेमकं हे हेरत आणि त्यांना थेटच विचारलं. तुमच्या डोळ्यात पाणी दिसतंय? तुम्ही भावूक झालात? त्यावर उद्धव ठाकरे यांनीही तितक्याच दिलखुलास आणि दिलदारपणे उत्तर दिलं.
हेही वाचा – बदलापूर शाळेतील अत्याचार प्रकरणातील सह आरोपी आपटे याला भाजपकडून नगरसेवक पद
मातोश्रीचे दरवाजे कुणालाच बंद नाही – उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मातोश्रीचे दरवाजे बंद आहेत का? असा थेट प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. ते म्हणाले, असं काही नाही. माझे दरवाजे कुणाला बंद नाही. पण मातोश्रीची बदनामी करणं थांबवा, आमच्या कुटुंबाला बदनाम करणं थांबवा. तुम्ही मातोश्री बदनाम का करता? मी तुमच्याबद्दल वैयक्तिक काही बोलत नाही. राजकारणावर बोलत आहे. मी भाजप किंवा अमित शहांवर टीका करतोय. मोदी मला नकली संतान म्हणाले. ही कोणती संस्कृती? ज्या मातोश्रींनी तुम्हाला वाचवलं, नाही तर मोदी दिसलेच नसते. प्रमोद महाजन असते तरी मोदी दिसले नसते. प्रमोदजी कर्तबगार माणूस होता. महाजनांना प्रत्येक शहर आणि राज्यांच्या गोष्टी माहीत होत्या. वाजपेयी मोदींना उचलून फेकत होते. तेव्हा बाळासाहेबांनी वाचवलं. त्या बाळासाहेबांच्या मुलाला तुम्ही उचलून फेकलं, असं सांगत असताना उद्धव ठाकरे भावूक झाले.
माझ्या मनात एक आणि ओठावर वेगळं नाही – उद्धव ठाकरे
माझ्या मनात एक आणि ओठावर वेगळं नाही. जे पटत नाही, ते पटत नाही. आणि चांगलं असलं तर शत्रूचं असेल तर पटलं म्हणणारा मी आहे. मित्राचं नाही पटलं तर नाही म्हणून सांगणारा आहे. अशीच अपेक्षा इतरांकडून आहे. माझं नाही पटलं तर मला समजवा. माझे आजोबा, वडील. आजोबा व्यासंगीच होते. आजोबा इतिहासाचे गाढे अभ्यासक. बाळासाहेबांची ओळख करून द्यायची गरज नाही. बाळासाहेब म्हणायचे की, टीका अशी करा की ओरबाडतोय असं वाटता कामा नये. आता हे जे काही चाललंय ते योग्य नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.












