Injustice to Sushma Andhare : ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) काय नि सुषमा अंधारे (Sushma Andhare) काय दोघीही आंबेडकरी चळवळीतून पुढं आलेल्या आक्रमक नेत्या! मूळ शिवसेनेची शकलं झालेल्या वेगवेगळ्या शिवसेनेच्या दोघीही रणरागिणी, अभ्यासू आणि फायरब्रॅंड नेत्या! पण एका शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना जे जमलं ते दुसऱ्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना का जमलं नाही, हाच खरा सवाल आहे. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) ऐनवेळी ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी घोषित करून त्यांच्या बाबतीत एक प्रकारे न्याय केला पण उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शरद पवारांना (Sharad Pawar) पाठिंबा देऊन आपल्याच पक्षातील महिला नेत्या सुषमा अंधारेंवर एकप्रकारे अन्यायच केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या राज्य प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्याआधी भाजपनं देखील माया इवनाते आणि रामराव वडकुते यांची नावं जाहीर करून सर्वांनाच धक्का दिला. तिकडं राष्ट्रवादीनं देखील नवख्या पार्थ पवारांना राज्यसभेची उमेदवारी बहाल केली. आता उरलं कोण तर महाविकास आघाडी! पण त्यातही घोळ! जागा एक आणि पक्ष तीन! काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष राज्यसभेची ही एक जागा आम्हालाच हवी म्हणून थोडा फार आव आणत एकमेकांवर गुरगुरले खरे पण 85 वर्षांचा तरूण योद्धा ‘अभी तो मै जवान हू’ म्हणत पुन्हा एकदा खुर्चीत बसण्यास आतुर असल्याचं म्हटल्यावर काँग्रेस आणि उद्धवसेनेनं हत्यार खाली टाकली. झालं… तिघांनी मिळून हो नाही हो नाही म्हणत अखेर एक नाव जाहीर करून टाकलं… शरद पवार!
हेही वाचा – राज्याचा अर्थसंकल्प! लाडकी बहिण योजनेबाबत मोठी घोषणा, कोणाला काय मिळाले? वाचा सविस्तर…
शेवटून पहिलं घेतलं जाणारं नाव म्हणजे ज्योती वाघमारे
महाविकास आघाडीनं साहेबांच्या नावाची एकमुखी घोषणा केल्यानंतर वेळ आली होती ती शिंदेंसेना कुणाचं नाव ‘फायनल’ करणार याची. शिंदेसेनेतून अनेकांची नावं चर्चेत राहिली. आनंद अडसूळ, गजानन कीर्तिकर, संजय निरूपम, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, शायना एनसी आणि शेवटून पहिलं घेतलं जाणारं नाव म्हणजे ज्योती वाघमारे! पण शेवटून पहिलं असलेलं नाव सर्वांत पहिलं आलं आणि ते फायनलही झालं. यालाच म्हणतात दे धक्का किंवा जोर का झटका धीरेसे लगे! एकनाथ भाईंनी दिलेल्या या धक्क्यातून अजूनही बरेचजण सावरले नसावेत. ज्योती वाघमारे यांचं नाव जाहीर होताच सोलापुरातील शिंदेसेना आणि मोची समाजाच्या वतीनं एकच जल्लोष करण्यात आला.
तेव्हा वाटलं की यापेक्षा मोठं दुसरं काहीही होऊ शकत नाही
आपलं नाव जाहीर होताच ज्योती वाघमारे यांनी दिलेली प्रतिक्रिया फार बोलकी होती. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे आभार! मला वाटलं नव्हतं की, कधी हा दिवस येईल. कारण लहानपणापासून भाकरीचा संघर्ष बघितलाय. लहानपणापासून भुकेचे चटके सोसलेत. अशातच शिवसेना सेनेच्या दसरा मेळाव्यात बोलण्याची संधी मिळाली तेव्हा वाटलं की यापेक्षा मोठं दुसरं काहीही होऊ शकत नाही. परंतु शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जसं म्हणायचे की, शिवसैनिक हीच तुमची जात आणि तोच तुमचा धर्म! मी खूप साधी, खूप गरीब मुलगी आहे. मला राजकारण कळत नाही. पण मला विश्वास आहे की, माझे नेते एकनाथ शिंदे यांनी जी संधी मला दिली, त्या संधीचं मी सोनं करेन. ज्येष्ठ नेत्यांचं योगदान पक्षासाठी खूप महत्त्वाचं आहे. कुठलाही वारसा नसलेली, कुठल्याही घराण्याची परंपरा नसलेली आणि कुठल्याही पद्धतीचं आरक्षण नसतानाही माझ्यासारखी दलित समाजाची मुलगी देशाच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचतेय त्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार!
जे एकनाथ शिंदेंना जमलं ते उद्धव ठाकरेंना का जमलं नाही?
जे एकनाथ शिंदेंना जमलं ते उद्धव ठाकरेंना का जमलं नाही? कारण त्यांच्याकडंही असंच एक आक्रमक महिला नेतृत्व आहे की, पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे! सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत अशा वेळी प्रवेश केला होता ज्यावेळी उद्धवसेनेसमोर अस्तित्वाचं संकट उभं होतं. अशा खडतर परिस्थितीत सुषमा अंधारे शिवसेनेची ढाल बनल्या आणि आपल्या वक्तृत्व शैलीनं पक्षाची भूमिका राज्यभरात पोचवण्यात यशस्वी ठरल्या.
पहिल्याच दसरा मेळाव्यात संधीचं अक्षरशः सोनं केलं
“आज शिवसेनेत माझ्या लढवय्या साथी आल्या आहेत,” असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांचं पक्ष प्रवेशावेळी स्वागत केलं होतं. विशेष म्हणजे सुषमा अंधारेंनी ज्यावेळी पक्षप्रवेश केला होता त्यावेळी पक्षाची मुलुख मैदानी तोफ अर्थात संजय राऊत तुरूंगात होते. पक्षप्रवेशानंतर त्या लगेचच उपनेत्या बनल्या आणि प्रवेशानंतर झालेल्या पहिल्याच दसरा मेळाव्यात त्यांना मिळालेल्या भाषणाच्या संधीचं अक्षरशः सोनं केलं.
दुसरीकडं म्हणता की सुषमा अंधारे हिंदुत्ववादी शिवसेनेत कशा?
आला पण शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या या प्रश्नाचं उत्तर देऊन त्यांनी सवालकर्त्यांची तोंडं बंद केली. उत्तरादाखल त्या म्हणाल्या होत्या , “कठीण आहे. तुमचंच चित आणि तुमचंच पट. एकीकडं तुम्ही म्हणता शिवसेनेने हिंदुत्ववाद सोडला आणि दुसरीकडं म्हणता की सुषमा अंधारे हिंदुत्ववादी शिवसेनेत कशा? ज्याला नांदायचं नसतं त्याला बारा बुद्ध्या सुचतात. यातलाच हा प्रकार नाही का?”
उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाची व्याख्या पटवून देताना त्यांनी केलेली भाषणं जरा ऐकून पाहाच!
जर का सुषमा अंधारे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली असती
निदान उद्धव सेनेच्या पक्ष नेतृत्वानं जरी ही भाषणं ऐकली असती, तरी पक्षाच्या संकटकाळात आपल्या मदतीला धावून आलेल्या सुषमा अंधारेंना राज्यसभेची उमेदवारी मिळवून देण्यासाठी धडपड केली असती आणि जर का सुषमा अंधारे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली असती, तर पुढील काळात संजय राऊत, ज्योती वाघमारे आणि सुषमा अंधारे यांनी आपल्या आक्रमक वक्तृत्व शैलीतून सत्ताधारी पक्षाची पिसं काढली असती.











