चेन्नई : तमिळनाडूतील करूर इथं अभिनेता आणि नेता विजय याच्या रॅलीदरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत तब्बल 39 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश असल्याची शक्यता स्थानिक रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलीन यांनी घटनेचा आढावा घेतला असून या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी :
अभिनेता विजय याचा राजकीय पक्ष तमिलागा वेत्री कझगम (TVK) च्या माध्यमातून रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत अभिनेता विजयचे समर्थक सहभागी झाले होते. रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी तब्बल सहा तासांपासून विजयची वाट पाहिली. अभिनेता विजय उशीरा रॅलीत पोहोचला, त्यामुळं विजयच्या चाहत्यांची मोठी गर्दी उसळली. मात्र यावेळी चेंगराचेंगरी झाली.
मृतांना प्रत्येकी 10 लाख जाहीर :
या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाखांची मदत जाहीर करण्यात आलीय तर जखमींना एक लाखांची मदत दिली जाणार आहे. या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दुःख व्यक्त केलं आहे. दरम्यान, गृह मंत्रालयानं आता करुर अपघाताची दखल घेतली आहे. मंत्रालयानं तामिळनाडू सरकारकडून अपघाताची परिस्थिती आणि घटनास्थळी केलेल्या बचाव आणि मदत प्रयत्नांचा तपशीलवार अहवाल मागवला आहे. राज्य सरकारला हा अहवाल लवकरच गृहमंत्रालयाला सादर करावा लागेल.
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख :
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं, “तामिळनाडूतील करुर इथं राजकीय रॅलीदरम्यान घडलेली दुर्दैवी घटना अत्यंत दुःखद आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्या कुटुंबियांसह माझ्या संवेदना आहेत. या कठीण काळात मी त्यांना शक्ती मिळो अशी प्रार्थना करतो. सर्व जखमींना लवकर बरे होण्याची मी प्रार्थना करतो.”