ICC player sentenced : पापुआ न्यू गिनी क्रिकेट संघातील एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी जर्सी इथं आयसीसी वर्ल्ड कप चॅलेंज लीग आयोजित करण्यात आली होती. 30 वर्षीय किप्लिन डोरिगा हा त्याच्या देशाचं, पापुआ न्यू गिनीचे प्रतिनिधित्व करत होता. अहवालानुसार त्यानं एका महिलेवर हल्ला केला आणि तिचा फोन चोरला. यामुळं त्याच्यावर कारवाई करण्यात आली आणि 28 नोव्हेंबर 2025 रोजी त्याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
आयसीसी स्पर्धेदरम्यान घडलं घृणास्पद कृत्य :
वास्तविक 25 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 2:30 वाजता, जर्सीच्या सेंट हेलियर येथील हिलरी स्ट्रीटवर आयसीसी वर्ल्ड कप चॅलेंज लीग स्पर्धेदरम्यान डोरिगा त्याच्या हॉटेलमध्ये परतत होता. पोलिसांनी त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे की डोरिगाने एका महिलेला पाहिलं आणि तिला मुक्का मारत तिला खाली पाडलं. किप्लिननं महिलेचा फोन चोरला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच दिवशी डोरिगाला ताब्यात घेतलं. तो जर्सी मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर झाला आणि त्याच्यावर दरोड्याचा आरोप ठेवण्यात आला. 27 ऑगस्ट 2025 रोजी त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं. 28 नोव्हेंबर रोजी जर्सीच्या रॉयल कोर्टानं किप्लिनला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
🚨Papua New Guinea WK-batter Kiplin Doriga has been charged with robbery 🚨
Happened during the ICC Cricket World Cup Challenge League in Jersey on 25th August.#CricketTwitter pic.twitter.com/XfbH8ByR42
— alekhaNikun (@nikun28) August 31, 2025
पोलिसांनी काय म्हटलं? :
या प्रकरणावर बोलताना, जर्सी पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे डिटेक्टिव्ह सार्जंट जिम मॅकग्रानाहन म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून परिसरात असलेल्या एका अज्ञात पुरूषाची अतिशय जलद चौकशी करण्यात आली. हा आरोप रात्रीच्या वेळी एका महिलेवर हल्ला करण्याचा होता आणि पोलिसांनी अनेक गुप्तहेर तैनात केले, ज्यांनी डोरिगाला त्वरीत शोधून काढलं. त्याला अटक करण्यात आली आणि चोरीला गेलेल्या वस्तू जप्त करण्यात आल्या.”
हे ही वाचा : जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज अन् अंपायर्सनं थांबवली मॅच; सोशल मीडियावर अंपायर्सवर टीकास्त्र
पापुआ न्यू गिनीसाठी खेळले 82 सामने :
किप्लिन डोरिगानं नोव्हेंबर 2017 मध्ये पापुआ न्यू गिनीसाठी पदार्पण केलं. तेव्हापासून, त्यानं एकूण 82 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपल्या देशाचं नेतृत्व केलं आहे. या विकेटकीपर-फलंदाजानं 39 वनडे सामन्यांमध्ये 20.27 च्या सरासरीनं 730 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये चार अर्धशतकं आहेत. त्यानं 43 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही खेळलं आहे, ज्यामध्ये एकूण 359 धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 46 होती. मात्र, आता या प्रकरणामुळं त्याची क्रिकेट कारकीर्द आता धोक्यात आली आहे.












