जयपूर SRH Beat RR : आयपीएल 2026 च्या 36 व्या सामन्यात एक हाय-व्होल्टेज लढत पाहायला मिळाली. 2008 चे विजेते राजस्थान रॉयल्स आणि 2016 चे विजेते सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला, जिथं सनरायझर्स हैदराबादने 5 गडी राखून विजय मिळवला. हैदराबादच्या फलंदाजांनी जयपूरमध्ये शानदार कामगिरी केली.
हेही वाचा : 264 धावा करुनही दिल्लीचा पराभव; 265 धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पंजाबकडून
वैभवचं शानदार शतक :
तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, राजस्थान रॉयल्सने 6 गडी गमावून 228 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीने राजस्थानसाठी 103 धावा करत शानदार शतक झळकावले. ध्रुव जुरेलनेही शानदार अर्धशतक झळकावले. हैदराबादकडून प्रफुल्ल हिंगे आणि इशान मलिंगा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
हैदराबादचा सलग चौथा विजय :
राजस्थान रॉयल्सच्या मोठ्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना, सनरायझर्स हैदराबादने शानदार फलंदाजी करत 19 व्या षटकात 5 गडी गमावून 229 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. सनरायझर्स हैदराबादकडून इशान किशनं 31 चेंडूंमध्ये 74 धावांची वेगवान खेळी केली. अभिषेक शर्माने 29 चेंडूंमध्ये 57 धावांची वादळी खेळी केली. आयपीएल 2026 मधील एसआरएचचा हा 5 वा विजय आहे. अशाप्रकारे, हैदराबाद संघ आता 10 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. राजस्थान रॉयल्स तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरला आहे. हैदराबाद आणि राजस्थान या दोघांचेही 10 गुण समान आहेत, परंतु एसआरएचचा नेट रन रेट चांगला आहे.









