T20 World Cup 2026 Day 2 : 2026 च्या टी-20 विश्वचषकाचा दुसरा दिवस उत्साहानं भरलेला होता. इंग्लंड आणि नेपाळ क्रिकेट संघातील दिवसाचा दुसरा सामना क्रिकेट चाहत्यांना वर्षानुवर्षे लक्षात राहील असा सामना होता. हा एक रोमांचक सामना होता, ज्यामध्ये इंग्लंडनं शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. दिवसाच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्ताननं न्यूझीलंडविरुद्ध 180 पेक्षा जास्त धावा करुनही पराभव पत्करला. तर तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेनं आयर्लंडविरुद्ध सहज विजय मिळवला.
न्यूझीलंडनं गाठलं 183 धावांचं लक्ष्य :
आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या गट डी मध्ये न्यूझीलंडनं आपल्या मोहिमेची सुरुवात विजयानं केली. त्यांनी अफगाणिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्ताननं अनुभवी गुलबदीन नायब (63) च्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत सहा विकेट्स गमावून 182 धावा केल्या. 183 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, न्यूझीलंडनं 17.5 षटकांत पाच गडी गमावून 183 धावा करुन सामना जिंकला. सलामीवीर आणि यष्टीरक्षक टिम सेफर्टच्या 42 चेंडूत 65 धावांच्या खेळीमुळं सेफर्टला त्याच्या शानदार फलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
रोमांचक सामन्यात नेपाळचा पराभव :
इंग्लंड आणि नेपाळ यांच्यात खेळलेला दिवसाचा दुसरा सामना सर्वात रोमांचक होता. इंग्लंडनं नेपाळविरुद्ध हा सामना चार धावांनी जिंकला. या सामन्यात नेपाळ अपसेट करुन इतिहास रचण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, परंतु शेवटी दबावाखाली ते कोसळले. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं सात गडी गमावून 184 धावा केल्या. प्रत्युत्तरात, नेपाळला सहा गडी गमावून 180 धावा करता आल्या. शेवटच्या षटकात नेपाळला विजयासाठी 10 धावांची आवश्यकता होती, परंतु सॅम करननं उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि फक्त पाच धावा दिल्या. लोकेश बामकडून नेपाळला मोठ्या आशा होत्या. त्यानं 20 चेंडूत 39 धावा केल्या पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
श्रीलंकेचा आयर्लंडविरुद्ध सहज विजय :
2026 च्या टी-20 विश्वचषकातील सहाव्या सामन्यात श्रीलंकेनं आयर्लंडचा 20 धावांनी पराभव केला. आयर्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेनं 20 षटकांत सहा गडी बाद 163 धावा केल्या. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसनं 43 चेंडूत पाच चौकारांसह नाबाद 56 धावा केल्या. कामिंदू मेंडिसनं 19 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांसह 44 धावा केल्या. प्रत्युत्तरात, आयर्लंड 19.5 षटकांत 143 धावांवर ऑलआउट झाला. आयर्लंडचा एकही फलंदाज मोठी खेळी करु शकला नाही.












