Advay Hire joins BJP : उत्तर महाराष्ट्रातील ठाकरे शिवसेनेतील मोठं नाव असलेले उपनेते अद्वय हिरे यांनी ठाकरे गटाची साथ सोडली आहे. त्यांनी भाजपचं कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा आज मुंबई येथील भाजपच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते पक्ष प्रवेश होणार आहे. अद्वय हिरे यांनी मंत्री दादा भुसे यांना विधानसभा निवडणुकीत कडवे आव्हान दिलं होतं. ही लढत उत्तर महाराष्ट्रातील सर्वात रंगतदार ठरली होती. अद्वय हिरे यांच्या प्रवेशाने आता नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार आहे. यामुळे नाशकातील सर्व राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपूर्व हिरे, प्रसाद हिरे, तुषार शेवाळे यांच्याबरोबरच अद्वय हिरे देखील भाजपात प्रवेश करणार असल्याने ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे. मात्र, अद्वय हिरे यांचा भाजप प्रवेश हा राजकीय दबावाचा बळी की, मग राजकारणाची नवी खेळी आहे हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 17 नोव्हेंबर रोजी संपली. या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या संकटकाळात साथ देणाऱ्या एक मोठ्या नेत्यानं उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीत हे यश महाविकास आघाडीला टिकवता आलं नाही. विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. त्यानंतर महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाल्याचं पहायला मिळात आहे. अनेक बड्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची वाट धरली आहे.
हेही वाचा – Mohol Election : भाजपला निवडणुकीच्या आधीच विजयश्री! राजन पाटलांनी निवडून आणले १७ बिनविरोध
गुन्हे शाखेनं भोपाळमधून उद्वय हिरे यांना केली होती अटक
अद्वय हिरे यांना नाशिक जिल्हा बँकेच्या 7 कोटी, 46 लाखाच्या कर्ज घोटाळ्या प्रकरणी अटक झाली होती. अद्वय प्रशांत हिरे आणि एकूण 30 जणांविरोधात 30 मार्च 2023 ला मालेगावच्या रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बनावट दस्तऐवज तयार करून बँकेची 7 कोटी 46 लाख रुपयांची कर्ज उचलून बँकेची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू होता, त्यानंतर आरोपी अद्वय हिरे यांनी मालेगाव सेशन कोर्टात जामिनासाठी धाव घेतली होती. त्यानंतर अंतरिम जामीनासाठी हायकोर्टाकडे ते गेले होते, मात्र 6 नोव्हेंबर 2023 ला तो अर्ज फेटाळताच स्थानिक गुन्हे शाखेनं भोपाळमधून त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी 13 ऑगस्ट 2024 रोजी अद्वय हिरे यांचा मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला. त्यानंतर त्यांनी ऑक्टोबर रोजी 2024 रोजी झालेल्या विधानसभा निवडणूकीत मंत्री दादा भूसे यांना कडवे आव्हान दिले होते. मात्र, काही मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला.
अद्वय हिरे यांची आतापर्यंतची राजकीय वाटचाल वादग्रस्त राहिली
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मातब्बर घराणे म्हणून ओळख असलेल्या मालेगावच्या हिरे घराण्याच्या प्रतिमेला धक्का बसला होता. कुळ कायद्याचे जनक म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे पणतू असलेल्या अद्वय यांची आजवरील राजकीय वाटचाल तशीच वादग्रस्त राहिली आहे. हिरे यांच्याविरुध्द दाखल झालेल्या गुन्ह्यांना राजकीय पदर नक्कीच आहे. त्यांचे कट्टर विरोधक नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचे दबावतंत्र त्यास कारणीभूत असल्याचं चर्चा हळू आवाजात सुरू आहेत. मात्र, असे असले तरी हिरेंविरुध्द दाखल असणाऱ्या गुन्ह्यांमधील तक्रारींचे गांभिर्यदेखील दुर्लक्षित करण्याजोगे नसल्याचे काहीचं म्हणणं आहे, त्यामुळे अद्वय हिरे यांचा भाजप प्रवेश हा राजकीय दबावाची बळी आहे की राजकारणाची नवी खेळी आहे. हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.












