Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) ज्योतिषी अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरातवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर या प्रकरणी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) त्याला अटक केली आहे. तर अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपली असून त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं.
खरात प्रकरणावर न्यायालयाने काय दिला निर्णय?
गेल्या दोन आठवड्यांपासून अशोक खरात हा पोलीस कोठडीत होता. तर आज त्याची पोलीस कोठडी संपली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली जाणार आहे.
अशोक खरातला आज न्यायाधीश श्रीमती बी इन ईचपुरानी यांच्या कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायधीशांनी काही कागदपत्रे तपासली आणि बाकी माहिती तपास अधिकाऱ्यांकडून घेतली. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांमध्ये अशोक खरातला न्यायाधीशांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खरातला ही शिक्षा पहिल्या गुन्ह्यासाठी देण्यात आली आहे.
उद्याही (2 एप्रिल) अशोक खरातला कोर्टात हजर केले जाणार आहे. दुसऱ्या गुन्ह्यासंदर्भात अशोक खरातला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे उद्या त्याला कोणती शिक्षा मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशोक खरात प्रकरणाचा तपास सध्या विशेष तपास पथकाकडून केला जात आहे. या प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना खरातचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर काल मध्यरात्री एसआयटीने खरातच्या नाशिकमधील बंगल्यावर धाड टाकली होती. मात्र, त्या बंगल्यातून खरातची पत्नी फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या एसआयटीने खरातचा मुलगा हर्षवर्धनला ताब्यात घेतले असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. तर पोलीस खरातच्या पत्नीचा देखील शोध घेत आहेत. त्यामुळे खरातच्या पत्नीलाही लवकरच अटक होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, मागील 2 आठवड्यांपासून एसआयटीकडून आणि नाशिक पोलिसांकडून अशोक खरात प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. या तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. यामध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार, लोकांची आर्थिक फसवणूक, लुबाडलेल्या जमीन जुमला अशा अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.










