Cyclone Montha Andhra Odisha : बंगालच्या उपसागरात उद्भवलेलं ‘मोंथा’ हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील काकीनाडा आणि मछलीपट्टनम दरम्यानच्या किनाऱ्यावर धडकलं आहे, ज्यामुळं किनारपट्टी भागातील शेकडो घरं आणि झाडांचं मोठं नुकसान झालं आहे. परिणामी यामुळं हवाई आणि रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्या आहेत. दरम्यान, चक्रीवादळ आता उत्तर आणि वायव्येकडे हळूहळू सरकत आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे वाहत आहेत. वादळाचा सर्वाधिक फटका आंध्र प्रदेशला बसत आहे. चक्रीवादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 110 किलोमीटर होता, त्यामुळं रहिवाशांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच राज्य सरकारं सतर्क आहेत.
दक्षिण मध्य रेल्वे झोनच्या 120 गाड्या रद्द : चक्रीवादळाचा प्रभाव कमी करण्यासाठी, आंध्र प्रदेश सरकारनं 22 जिल्ह्यांमध्ये 3174 निवारा गृहे उभारली आहेत. दरम्यान, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, विजयवाडा आणि तिरुपती विमानतळांवरुन 52 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. तसंच दक्षिण मध्य रेल्वे झोनच्या एकूण 120 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफनं 25 पथकं तैनात केली आहेत आणि 20 पथकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आंध्र प्रदेशात प्रचंड विनाश :
मोंथा चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे येत आहेत. आंध्र प्रदेशला वादळाचा सर्वाधिक फटका बसत आहे. जेव्हा चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकलं तेव्हा त्याचा वेग ताशी 110 किलोमीटर होता. त्याच्या मार्गातील सर्व काही गवताच्या गंज्यासारखे उडून गेलं. झाडांसह घरांचंही मोठं नुकसान झालं.
VIDEO | Andhra Pradesh: Visuals show aftermath of Cyclone Montha in Kakinada.
Severe Cyclonic storm Montha made landfall off the coast of Andhra Pradesh, causing disruptions in the southern state, while the impact was also felt in neighbouring Odisha, where normal life was… pic.twitter.com/OP4Wnl0NfI
— Press Trust of India (@PTI_News) October 29, 2025
90-100 किमी प्रतितास वेगानं वारे (Cyclone Montha Andhra Odisha)
मोंथा चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील काकीनाडा आणि मछलीपट्टनम दरम्यान जमिनीवर धडकल्यानं आंध्र प्रदेश ते ओडिशापर्यंत सर्व भागात सतर्कता आहे आणि आता ते उत्तर आणि वायव्येकडे सतत सरकत आहे. 90 ते 100 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. लोक घरे सोडून आश्रयस्थानांकडे जात आहेत. अनेक बचाव पथकं तैनात आहेत.
ओडिशाच्या 9 जिल्ह्यांमधील शाळा 30 ऑक्टोबरपर्यंत बंद :
ओडिशात, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि ओडीआरएएफच्या 140 बचाव पथकांसह 5000 हून अधिक कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलं आहे. तसंच 9 जिल्ह्यांमधील शाळा आणि अंगणवाड्या 30 ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील. सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे परिस्थिती लक्षात घेता, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू रात्रभर सचिवालयात राहिले. मध्यरात्री चक्रीवादळ किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता असल्यानं त्यांनी अधिक दक्षता घेण्याचं आवाहन केलं.












