Pune Crime News | पुण्यात (Pune) वैष्णवी हगवणे प्रकरणाची (Vaishnavi Hagwane Case) पुनरावृत्ती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील लोहगाव (Lohgaon) परिसरात हुंड्यासाठी एका विवाहितेचा छळ केल्याची घटना घडली आहे. विवाहितेवर गरम पाणी ओतत तिच्यावर सासरच्यांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोहगाव पोलिसांनी एका बड्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – दरबार ते घरपोच भेट! एका व्हिजिटसाठी भोंदू खरात किती पैसे घेत होता? झाला धक्कादायक खुलासा
लोखंडे परिवाराकडून सुनेचा अमानूष छळ
मिळालेल्या माहितीनुसार, मुळशीतील संत तुकाराम कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल लोखंडे आणि त्यांची पत्नी सुवर्णा लोखंडे यांनी हुंड्यासाठी त्यांच्या सुनेचा छळ केल्याचं समोर आलं आहे. पीडित विवाहितेच्या लग्नात तिच्या माहेरच्यांनी सुमारे 2 कोटी रूपये एवढा खर्च केला होता. यामध्ये त्यांनी अनिल लोखंडे यांच्या परिवाराला अलिशान चार चाकी गाडी, सोने आणि 2 किलो चांदी दिली होती. मात्र, एवढं देऊनही लोखंडे कुटुंबाचं समाधान झालं नव्हतं.
पैशांसाठी सुनेच्या डोक्याला लावली पिस्तुल
शेअर मार्केटमध्ये लोखंडे कुटुंबाचे 2 कोटींचे नुकसान झाले होते. तर हे नुकसान भरून काढण्यासाठी लोखंडे परिवाराने त्यांच्या सुनेला माहेरून पैसे आणण्यास सांगितले होते. माहेरच्यांकडून पैसे आणावे म्हणून लोखंडे कुटुंबाने सूनेसोबत अतिशय क्रूरपणे वागत तिच्यावर अत्याचार केला. कधी तिच्या डोक्याला पिस्तुल लावली तर कधी तिच्या अंगावर गरम पाणी ओतण्याचा प्रयत्न केला, अशाप्रकारे लोखंडे परिवार त्यांच्या सुनेचा छळ करत होतं.
लोखंडे परिवाराच्या या अमानुष कृत्यामुळे परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. तर याप्रकरणी लोखंडे परिवारावर लोहगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अटकेपासून आपला बचाव करण्यासाठी आरोपी अनिल लोखंडे आणि सुवर्णा लोखंडे यांनी कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, कोर्टानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तर सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हगवणे कुटुंबाने हुंड्यासाठी वैष्णवीचा मानसिक, शारीरिक छळ केला होता. तर सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळालं. लोखंडे परिवाराने देखील पैशांसाठी सुनेचा छळ करत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनं संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.












