Jitendra Awhad’s Apology :शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) हे नेहमी चर्चेत असतात. त्याला कारण असतं त्यांची वादग्रस्त वक्तव्ये. आताही आव्हाड पुन्हा आपल्या वक्तव्यामुळेच चर्चेत आले आहेत. त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यावरून विधानसभेत गदारोळ (Uproar in the Legislative Assembly) पाहायला मिळाला. शिवरायांच्या राज्याभिषेकावरील वक्तव्यानंतर (The Insult to Chhatrapati Shivaji Maharaj) आव्हाडांना माफी मागावी लागलीय. कारण आव्हाडांनी हे विधान करताच सत्ताधारी पक्षातील नेते आक्रमक झाले. त्यानंतर अध्यक्षांनीही आव्हाडांना झापलं आणि शेवटी त्यांनी (Jitendra Awad apologized) माफी मागितली.
महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारी राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंदर्भात केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे प्रचंड गोंधळ उडाला. या विधानानंतर सत्ताधारी महायुतीचे आमदार आक्रमक झाले, ज्यामुळे सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले. अखेर विधानसभा अध्यक्षांच्या निर्देशानंतर आव्हाड यांनी सभागृहात हात जोडून माफी मागितली.
हेही वाचा – महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! “कापून टाकू, ठोकून काढू…”, अंबादास दानवेंना मध्यरात्री धमकीचे फोन
‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक, २०२६’ वर चर्चा
विधानसभेत ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक, २०२६’ वर चर्चा सुरू होती. या चर्चेत सहभागी होताना जितेंद्र आव्हाड यांनी इतिहासातील विविध दाखले देण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा संदर्भ दिला. आव्हाड यांनी दावा केला की, “छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पायाच्या अंगठ्याने टिळक लावून करण्यात आला होता”. हे विधान करताच सभागृहात एकच गदारोळ सुरू झाला.
अजित पवार गट पक्षाच्या आमदारांचा आक्रमक पवित्रा
आव्हाडांचे हे वक्तव्य ऐकताच सत्ताधारी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. कॅबिनेट मंत्री दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांनी या विधानाचा तीव्र निषेध केला. “जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान केला आहे,” असे म्हणत मंत्री नितेश राणे यांनी आव्हाडांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. सत्ताधारी आमदार सभात्याग करत अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत जमले आणि आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
गोंधळमुळे सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब
गोंधळ इतका वाढला की अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. सभागृह पुन्हा सुरू झाल्यानंतरही सत्ताधारी पक्षाचा संताप कायम होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. “छत्रपती शिवाजी महाराज किंवा कोणत्याही राष्ट्रीय महापुरुषांबद्दल अशा प्रकारचे विधान करणे अत्यंत खेदजनक आहे,” असे म्हणत त्यांनी आव्हाडांना ताकीद दिली.
तर मी हात जोडून माफी मागतो
अध्यक्षांच्या सूचनेनुसार जितेंद्र आव्हाड यांनी आपली चूक मान्य करत सभागृहाची माफी मागितली. “माझ्या विधानाने कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी हात जोडून माफी मागतो,” असे त्यांनी नमूद केले. यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आव्हाड यांचे ते वादग्रस्त वक्तव्य विधानसभेच्या अधिकृत कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश दिले. त्यानंतर या वादावर पडदा पडण्याची अपेक्षा होती, मात्र यावरून राजकारण नाही पेटलं तर महाराष्ट्र कसला? आता यावरून जोरदार वादंग सुरू आहे, अनेक तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.
“औरंगजेब, अफजलखान आणि शाहिस्तेखान नसते तर…”
जितेंद्र आव्हाड यांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी “औरंगजेब, अफजलखान आणि शाहिस्तेखान नसते तर शिवाजी महाराजांचे मोठेपण जगाला समजले नसते” असे विधान केले होते. तसेच प्रभू रामाबाबत केलेल्या एका विधानावरूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. या जुन्या संदर्भांचा दाखला देत विरोधकांनी आव्हाडांवर ‘तुष्टीकरणाचे राजकारण’ केल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “आव्हाड सातत्याने हिंदू संस्कृती आणि महापुरुषांचा अपमान करत आहेत, त्यांना या सभागृहात बसण्याचा अधिकार नाही,” अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी दिली.
आव्हाड आणि वाद हे समीकरण नवं नाही
तर आव्हाड यांनी माफी मागितल्यानंतर हे प्रकरण आता संपले पाहिजे, असे संकेत पक्षाच्या वतीने देण्यात आले आहेत. सध्या तरी आव्हाडांनी माफी मागितल्याने सभागृहातील तात्पुरता वाद शमला असला, तरी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा राजकीय पातळीवर अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आव्हाड आणि वाद हे समीकरण जरी नवं नसलं तरी महाराजांच्या नावाचा वापर करून राजकारण करताना या नेत्यांना काहीच वाटत नाही का? की आपल्या व्होटबँकसाठी वारंवार महाराजांचं नाव घेऊन राजकारण करायचं आणि प्रत्यक्षात मात्र वेगळंच वागायचं, असं धोरण जवळपास नेत्यांचं असतं, नेत्यांनो तुम्हाला तुमचं राजकारण लख लाभ…पण महाराजांचं नाव तुमच्या राजकाणासाठी वापरु नका, एवढीच अपेक्षा…












