सध्या समाज माध्यमांवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ सोलापूर तालुक्यातील करमाळा तालुक्यातील कुर्डू येथील आहे. या घटनेत तुम्हारी इतनी हिम्मत…. मै कारवाई करूंगा असा दम उपमुख्यमंत्री अजित पवार आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना देताना दिसत आहे. याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांच्या फिर्यादीवरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यासह 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेकायदेशीररित्या उपसा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बाबा जगताप, नितीन माळी, संतोष कापरे, अण्णा धाणे यांच्यासह 15 ते 20 ग्रामस्थांचा समावेश आहे. याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी तक्रार नोंदवली, तर शेतकरी जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करा म्हणत आंदोलनाचाच इशारा दिला होता. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिसीएम अजित दादा आणि महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांचा व्हॉइस कॉल आणि व्हिडीओ कॉल व्हायरल झाल्यानंतर, तसेच माध्यमांत हे वृत्त झळकल्यानंतर आता संबंधित गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी तक्रार दिली आहे.
काय आहे प्रकरण
गेल्या काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुर्डू येथे बेकायदेशीर पद्धतीने मुरूम उपसा करण्यात येत होता. हा बेकायदेशीर उपसा रोखण्यासाठी महसूल अधिकारी आणि पोलीस अधिकारी या ठिकाणी गेले होते. परंतु याचवेळी राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते पोलीस आणि महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांना भिडले. यानंतर बाबा जगताप नामक राष्ट्रवादीच्या पदाधिका-याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना व्हाईस कॉल करून महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना दिला. यावेळी अजित पवार यांनी प्रशासनाची बाजू न घेता महिला आयपीएस अधिकाऱ्यास सुनावले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोठे जनआंदोलन करणार असा इशारा
या प्रकरणी शेतकरी नेते अतुल खूपसे यांनी या घटनेचा खुलासा करत अजित पवारांचा बेकायदेशीर कामांना पाठिंबा आहे का ?असा सवाल उपस्थित केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताबडतोब त्या महिला आयपीएस अधिकाऱ्याची माफी मागावी अन्यथा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोठे जनआंदोलन करणार असा इशारा दिला आहे. या संपूर्ण प्रकरणावरून अजित पवारांचा सोलापूरचे बीड करायचा तर प्लॅन नाही ना ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सोशल मीडियावर एकापाठोपाठ अनेक व्हिडीओ वायरल –
सध्या समाज माध्यमांवर लाखो लोक सक्रिय असतात. गेल्या काही वर्षांपासून समाज माध्यमावर कोणतीही घटना घडल्यास त्या संदर्भातील व्हिडीओ व्हायरल होतात. त्याचप्रकारे अजित पवारांचा व्हाईस कॉल वर बोलतानाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आणि शेवटी अजित पवार यांच्या वर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओ सोबतच कुर्डु येथील शेतकरी, ग्रामस्थ आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना,पोलीस अधिकाऱ्यांना कशा प्रकारे अरेरावीची भाषा वापरत आहेत. हा देखील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
प्रकरणाला राजकीय वळण
या संपूर्ण घटनेचे पडसाद समाज माध्यमांसोबतच राजकीय क्षेत्रात देखील पाहायला मिळत आहे. एकीकडे आयपीएस अंजना कृष्णा यांना समाज माध्यमांवर वाहवा होत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक त्यांच्यावर ताशेरे ओढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी थेट यूपीएससी ला पत्र पाठवून कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी केली आहे. तर आयपीएस अधिकारी यांना छळण्याचा प्रयत्न केल्यास कोर्टात खेचेल असा इशारा जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला आहे.
हे प्रकरण आता काय वळण घेईल हे पाहणे फायदेशीर ठरेल.