Maharashtra Heatwave : राज्यभर उष्णतेचा पारा प्रचंड वाढला असून नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे. मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडताना दिसत आहेत. अकोल्यात काल या मोसमातील सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागानं पुढील दोन दिवसांत तापमान 46 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळं शहरात ऐन दुपारी अघोषित संचारबंदी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये डिनर कार्यक्रमात गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले
तापमानाचा वाढता पारा :
गेल्या काही दिवसांत अकोल्यातील तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. या वाढत्या तापमानामुळं अकोला हे जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांपैकी एक ठरत आहे. परभणीत 37 वर्षीय युवकाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दिवसभर उन्हात फिरल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुंबईतही वाढला पारा :
मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला आहे. एप्रिल महिन्यातच मुंबईचा पारा 39 अंश सेल्सिअस वर पोहचला आहे. हवामान विभागाकडून खरंतर रविवारी आणि सोमवारी मुंबई शहरात आणि मुंबईच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. यानंतर आज मुंबईत चक्क पारा 39 अंश सेल्सियस वर पोहोचला आहे. या उन्हापासून वाचण्यासाठी मुंबईकरांनी घरी राहण्यास पसंती दिली आहे. तर जळगाव शहरात तापमान 43 अंशांच्या पुढे गेल्याने महानगरपालिकेने शहरातील प्रमुख चौकांमध्ये टँकरद्वारे पाणी मारण्याची मोहीम राबवली आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.
प्रशासनाचं काळजी घेण्याचं आवाहन :
प्रशासनाने नागरिकांना सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये, पुरेसं पाणी प्यावे आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असं आवाहन केलं आहे.





