Nagpur Schools New Timings: राज्यभरात सर्वत्र वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, प्रशासनाने आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. नागपूर जिल्ह्यात तापमान सातत्याने वाढत असल्याने शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अलीकडील दिवसांत उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून काही ठिकाणी उष्माघाताचा घटनाही समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शाळांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा: 8व्या वेतन आयोगात मोठे बदल? TA आणि शिक्षण भत्त्यात वाढीची मागणी; कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार लवकरच
नवीन आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सकाळी ७ ते १० वाजून ३० मिनिटं या वेळेत चालवण्यात येणार आहेत. हा निर्णय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली लागू करण्यात आला आहे.
हवामान विभागाचे म्हणणे काय?
दरम्यान, हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान उच्चांक गाठल्याचे नमूद केले आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा या भागांमध्ये तापमान खूपच वाढले असून काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच काही भागांमध्ये पुढील काळात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली, तरी सध्या उष्णतेपासून तातडीने दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.











