नागपूर : मराठा आरक्षण आणि ओबीसी संघर्षाच्या ज्वालेत महाराष्ट्र पेटला असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्रात मराठा समाजापाठोपाठ बंजारा, धनगर आणि वंजारी समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळं राज्य सरकार कोंडीत सापडलं आहे. अशातच नागपूरात हलबा महासंघाच्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
गडकरींचं वक्तव्य काय?
नागपूरात हलबा महासंघाच्या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, “मी ब्राह्मण जातीचा आहे. आमच्यावर परमेश्वरानं केलेला सर्वात मोठा उपकार म्हणजे आम्हाला आरक्षण नाही. महाराष्ट्रात ब्राह्मणांना विशेष महत्त्व नाही, पण उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ब्राह्मण समाजाचं वर्चस्व मोठं आहे. तिथं दुबे, त्रिपाठी यांची ताकद दिसून येते. महाराष्ट्रात जसं मराठा समाजाचं महत्त्व आहे, तसंच तिथं ब्राह्मणांचं आहे.”
गडकरी असं का म्हणाले?
नितीन गडकरी यांच्या या वक्तव्यामागे मोठा अर्थ दडलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, देशभरात आजही बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. शैक्षणिक प्रगती, आर्थिक प्रगती बरोबर सामाजिक प्रगतीदेखील महत्त्वाची आहे. समाजात पैसा आला, शिक्षण आलं. पण समाजाच्या तरुण मुलांवर संस्कार नसेल आणि हातभट्टी आणि दारु हे सुरु झालं ते मी एके काळी पाहिलं होतं. आता ती परिस्थिती नाही. हातमाग बंद झाला आणि हातभट्ट्या सुरु झाल्या होत्या. आता त्यादेखील बंद झाल्या. समाजातल्या वरिष्ठांची जबाबदारी आहे की त्यांनी समाज सुधारणेसाठी प्रयत्न केले पाहिजेत.
जातपातीपातींवर गडकरींची भूमिका
तसंच गडकरी यांनी जातपात नाकारत स्पष्ट केलं की, “माणूस मोठा होतो तो त्याच्या गुणांनी. समाजातील सुशिक्षित लोकांनी पुढील पिढीला योग्य दिशा देणं गरजेचं आहे.” राजकीय क्षेत्रात स्पष्ट आणि थेट बोलणारे नेते म्हणून गडकरी यांची ओळख आहे. याआधीही त्यांनी शिक्षण संस्थांमधील भ्रष्टाचार आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप यावर खुलेपणानं भाष्य केलं होतं. राज्यातील आरक्षण आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर गडकरींचं हे विधान पुन्हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरलं आहे. अनेक राजकीय विश्लेषक मानतात की या वक्तव्यामुळं समाजातील विविध गटांमध्ये राजकीय चर्चा तीव्र होऊ शकते.