Jyoti Waghmare’s Assets : सोलापुरातल्या जगजीवनराम झोपडपट्टीत राहणाऱ्या एका गरीब घरातली मुलगी आज देशाच्या सर्वोच्च सभागृहातील खुर्चीवर खासदार म्हणून बसणार असल्याची बातमी झळकली आणि ती मुलगी नेमकी आहे तरी कोण हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली. पक्षातील अनेक दिग्गजांना धक्क्याला लावून शिवसेनेनं राज्यसभेच्या उमेदवारीची माळ ज्यांच्या गळ्यात घातली ते नाव म्हणजे. त्यांच्याच भाषेत सांगतो. ज्योती नाम का मतलब फ्लॉवर नही होता फायर होता है | मी कुणाबद्दल बोलतोय हे एव्हाना समजलंच असेल राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे.
अनवाणी शाळेत जावं लागलं. शेजारच्या महिलांच्या साड्या नेसून वृत्तनिवेदन करावं लागलं. वाळलेल्या भाकरीचे तुकडे कुणाकडून तरी मागून ते पाण्यात बुडवून खावं लागलं. घरात वीज नसल्यानं महापालिकेच्या दिव्याखाली बसून शिकावं लागलं. बारावी बोर्डाची फी शिक्षकांनी भरल्यानंतर परीक्षेला बसावं लागलं. तीन हजार रूपये भरायला नव्हते म्हणून कला शाखेला अॅडमिशन घ्यावं लागलं. वर्षानुवर्षे तेच ते पत्रे असलेल्या मातीच्या घरात राहावं लागलं… वगैरे वगैरे!
गरीब घरातली मुलगी खासदार झाली हे वाक्य काही पचनी पडत नाही
आजकाल, ज्योती वाघमारे कुठल्या ना कुठल्या तरी टीव्ही चॅनेलवर आपल्या गरिबीचा काळ सांगताना दिसतायत आणि अश्रू गाळतायत. विरासत में हर किसीको सोने-चांदी जमीन जायदाद. जहागीर नहीं मिलती किसी को जिम्मेदारिया भी मिलती है… हा डायलॉग असो की, कुणी म्हणेल माझा बाप आमदार आहे. कुणी म्हणेल माझा बाप खासदार आहे. पण आज मी अभिमानानं म्हणतेय की माझा बाप इमानदार आहे हा डायलॉग असो. या त्यांच्या डायलॉगबाजीला हमखास टाळ्या पडतायत. असो, ज्योती वाघमारे संघर्षातून पुढं आल्या, शिकल्या, उच्चशिक्षित झाल्या इथपर्यंत ठीक आहे पण गरीब घरातली मुलगी आज खासदार झाली ही त्यांची बात… कुछ हजम नहीं हुई! कारण ज्योती वाघमारे आज खासदार झाल्या इतकंच वाक्य सत्य आहे, गरीब घरातली मुलगी खासदार झाली हे वाक्य काही पचनी पडत नाही.
ज्योती वाघमारे त्यांच्याकडं एकुण संपत्ती किती
कारण ज्योती वाघमारेंनी राज्यसभेसाठी निवडणूक अर्ज भरताना निवडणूक आयोगाला त्यांच्याकडं एकुण संपत्ती किती आहे याची माहिती दिलीये. उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या शपथपत्रात ज्योती वाघमारेंकडं लाखोंचं सोनं, चांदी आणि लाखोंची शेतजमीन असल्याचं उघड झालंय. त्यांच्याकडील जंगम आणि स्थावर मालमत्तेसह अन्य संपत्तीचं ची बेरीज केल्यास ज्योती वाघमारे यांच्याकडं ‘कोट’भर संपत्ती असल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे ज्योती वाघमारेंसारखी गरीबी सर्वांनाच लाभो रे देवा, अशी म्हणायची वेळी आलीय.
ज्योती वाघमारेंची एकूण संपत्ती किती? पाहूयात…
जंगम मालमत्ता – 5,78,088 रूपये
स्थावर मालमत्ता – 32,74,000 रूपये
वारसाप्राप्त संपत्ती – 14,10,000 रूपये
स्वसंपादित मालमत्ता – 33,60,000 रूपये
रोख रक्कम – 63 हजार रूपये
शेतजमीन – 27,74,000 रूपये
सोनं – (17 ग्रॅम) – 2, 52, 100 रूपये
चांदी – (41 ग्रॅम) – 17, 244 रूपये
सुझुकी कंपनीची बर्गमन गाडी – 95, 000 रूपये
कर्ज – 27,40,564 रूपये
एकूण संपत्ती – 1 कोटी 41 लाख 99 हजार 652 रूपये
‘कोट’भर प्रॉपर्टीच्या मालकीण मग तुम्ही गरीब घरातल्या खासदार कशा?
ज्योती ताई, आता तुम्हीच सांगा, ‘कोट’भर प्रॉपर्टीच्या मालकीण असताना तुम्ही गरीब घरातल्या खासदार कशा? एकेकाळी तुम्ही आर्थिकदृष्ट्या गरीब होतात हे आम्ही मान्य करतो पण राज्यसभा खासदार होतेवेळी आपण 1 कोटी 41 लाख 99 हजार 652 रूपये इतक्या संपत्तीच्या मालकीण आहात हे तुम्हालाही मान्य करावंच लागेल. बरं हे काय आम्ही हवेत बोलत नाही, तर तुम्हीच तुमच्या शपथपत्रात ही माहिती दिलीय. ज्योती ताई, आज तुमच्याकडं इतकी संपत्ती आहे की, आजही खेडोपाडी, वाड्या-वस्त्यांवर अनवाणी जात असलेल्या तुमच्या सारख्या हजारो ज्योतींना आपण आपल्या संपत्तीतून तुम्ही चपला खरेदी करून देऊ शकाल.
आपण आपल्या संपत्तीतून अन्नदान करू शकता
आजही ज्या आया-बहिणींना फाटक्या-तुटक्या वस्त्रांवर आपलं आयुष्य काढावं लागतंय अशा कितीतरी गोरगरीब स्त्रियांना आपण आपल्या संपत्तीतून वस्त्र पुरवू शकता. आजही उघड्यावर आलेली अशी कितीतरी कुटुंबं आहेत ज्यांना दोन वेळच्या अन्नासाठी वणवण भटकावं लागतंय, अशा कुटुंबांना आपण आपल्या संपत्तीतून अन्नदान करू शकता. आजही तुमच्यासारखी कितीतरी गोरगरीब पण अत्यंत हुशार मुलं-मुली आहेत, ज्यांच्याकडं अॅडमिशनची फी भरायला पैसे नाहीत. म्हणून आवडत्या क्षेत्रात करियर करता येत नाही, अशा मुला-मुलींना शैक्षणिक दत्तक घेत आपण आपल्या संपत्तीतून त्यांचं आवडीच्या करियरचं स्वप्न पूर्ण करू शकता…
काँग्रेसचा हात सोडून हातात शिवसेनेचा धनुष्यबाण धरला
असो, एप्रिल 2023 मध्ये शिंदेंसेनेत प्रवेश… म्हणजे शिवसेनेत जाऊन आपल्याला किती वर्षे झाली, तर इन-मिन तीन वर्षे! त्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्या म्हणून सोलापुरात आपला राजकीय वावर होताच. काँग्रेसचा हात सोडून हातात शिवसेनेचा धनुष्यबाण धरलात, पुढं जाऊन थेट शिवसेनेच्या प्रवक्त्या बनलात, धाराशिव जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखही बनलात… आणि गेली दोन वर्षात दसरा मेळावे असो की विविध राजकीय चर्चा; आपण आपल्या वक्तृत्वाच्या बळावर विरोधकांना सळो की पळो करत सुटलात.
खरं सांगू, आपण वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन इतकी बक्षीसं मिळवली असतील की प्रशस्तिपत्रकांनी फायलीच्या फायली आणि ट्रॉफीजनी कपाटंच्या कपाटं भरली असतील. त्यामुळं ज्योतीताई, तुम्ही गरीब घरातल्या आहात म्हणून नाही, तुम्ही उच्चशिक्षित आहात म्हणून तर मुळीच नाही; तुम्हाला आज राज्यसभेच्या खासदारकीचं जे भलं मोठं बक्षीस मिळालंय, ना ते तुमच्याकडं असलेल्या त्या वक्तृत्वगुणाच्या जोरावर! आपण गुणी आहात म्हणून खासदार बनलात, गरीब आहात म्हणून अजिबात नाही!











