Palash Legal Warning After Marriage : या क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. वूमन्स क्रिकेट टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न अखेर मोडलं आहे. स्वत: स्मृतीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. त्यानंतर आता पलाशने यावर प्रतिक्रिया दिली आहे. स्मृतीसोबतच लग्न मोडल्यानंतर पलाश याने थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
स्मृती आणि संगीतकार असलेला पलाश या दोघांचं नोव्हेंबर महिन्यात सांगलीत लग्न होणार होतं. मात्र स्मृतीच्या वडिलांना लग्नाच्या दिवशी हृदयविकाराचा झटका आल्याने लग्न स्थगित करण्यात आलं होतं. त्यानंतर पलाश याचीही प्रकृती बिघडली. त्यामुळे लग्न लांबणीवर पडलं. या दरम्यान अनेक अफवाही पाहायला मिळाल्या. त्यामुळे या दोघांचं ठरलेलं लग्न मोडणार की काय? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. अखेर तसंच झालंय.
हेही वाचा – स्मृती मंधाना-पलाश मुच्छल यांचं लग्न रद्द; दोघांनीही सोशल मीडियावर व्यक्त होत दिली माहिती
स्मृतीनंतर पलाश मुच्छल यानेही इंस्टाग्रामद्वारे स्टोरी पोस्ट करत लग्न मोडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच पलाशने संताप व्यक्त केला आहे. पलाशने त्याच्याबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना कायदेशीर दणका देणार असल्याचा थेट इशारा या स्टोरीद्वारे दिला आहे.
स्मतीने पोस्टमध्ये काय म्हटलं आहे..
स्मृती मंधानानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली, ज्यात लिहिलं आहे की, “गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबद्दल खूप अटकळ बांधली जात आहेत आणि मला वाटतं की सध्या माझ्यासाठी बोलणं महत्त्वाचं आहे. मी एक अतिशय खाजगी व्यक्ती आहे आणि मला ते असंच ठेवायचं आहे, परंतु मला हे स्पष्ट करायचे आहे की लग्न रद्द करण्यात आलं आहे. मी हे सर्व सोडून देऊ इच्छिते आणि मी सर्वांना तेच करण्याची विनंती करते.”
पलाशने स्टोरीत काय म्हटलंय?
“वैयक्तिक आयुष्यातून एक पाऊल मागे घेत आहे. तसेच खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार आहे, ज्यामुळे नात्यात अडचणी निर्माण झाल्या आणि वेगळे होण्याच्या बातम्यांना हवा मिळाले”, असं पलाशने म्हटलं आहे.












