Satyacha Morcha : राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार यांद्यामधील घोळाविरोधात ‘मविआ’कडून आज मुंबईत सत्याच्या मोर्चाच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच या मोर्चातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मविआच्या सत्याचा मोर्चाकडे महाराष्ट्र काँग्रेसने पाठ फिरवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या मोर्चामधून काँग्रेसचे बॅनर गायब असल्याचं दिसत आहे. या मोर्चामध्ये फक्त शिवसेना, मनसे, आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बॅनर दिसत आहेत. प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे या मोर्च्यात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
मनपा निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यानंतर मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी होणार नसल्याची सुत्रांची माहिती आहे. मुंबई काँग्रेस पदाधिकारी यांना मोर्चाबाबत कोणत्याही सूचना नाहीत. मनसेसोबत जाण्यास काँग्रेसचा नकार असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळेच मुंबई काँग्रेसने मोर्चाकडे पाठ फिरवल्याचं सांगितलं जात आहे.
मविआच्या सत्याच्या मोर्चाला भाजपकडून मूक मोर्चाने उत्तर
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज दुपारी १ वाजता गिरगाव चौपाटी येथे मूक आंदोलन केले जाणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह मुंबईतील सर्व आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळे एकप्रकारे मविआच्या सत्याच्या मोर्चाला भाजपकडून मूक मोर्चाने उत्तर दिले जाणार असल्याची माहिती भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी दिली आहे. महाविकास आघाडीची पोलखोल करण्याचे काम या आंदोलनातून करण्यात येणार आहे.
सत्याचा मोर्चासाठी खास मानवी चलचित्र
मुंबईतील आझाद मैदान येथे महाविकास आघाडीच्या होणाऱ्या सत्याच्या मोर्चासाठी पालघरमधून मनसैनिक तुलसी जोशी सहकार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांची सभा असो वा आंदोलने तुलसी जोशी यांचा नेहमी चलचित्र मार्फत हटके आणि वेगळापण दाखवण्याचा प्रयत्न करतात. मानवी चलचित्राच्या माध्यमातन पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आल्याचे दाखविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला आहे. मतचोरी करणाऱ्या सरकारविरोधात ठाकरे बंधूकडून चाबकाने मारत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
हा तर अपयशाच्या, नाकर्तेपणाच्या कबुलीचा मोर्चा!!
काँग्रेसमध्ये कुणी टिकत नाहीये, शरद पवार गटात कुणी थांबायला तयार नाही, राज ठाकरेंचा यशाचा सूर कधीच हरवलाय… आणि भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या उध्दव ठाकरेंनी विश्वास गमावलाय! अशा, भरकटलेल्या, हतबल नेत्यांचा हा मोर्चा ‘सत्याचा’ नाही … हा तर अपयशाच्या,
नाकर्तेपणाच्या कबुलीचा मोर्चा, असल्याची टिका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.








