Supriya Sule | सध्या साताऱ्यातील (Satara) प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांना थेट रस्त्यावर भाजपच्या (BJP) मंत्र्यांकडून मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार आक्रमक झाले आणि त्यांनी थेट विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदर आंदोलन केले. तर आता शंभुराज देसाईंना केलेल्या मारहाणीचा निषेध खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. सुप्रिया सुळेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा – अमेरिकेत रिफायनरीमध्ये भीषण स्फोट; टेक्सासमधील वलेरो इंधन केंद्र पेटलं, आणीबाणी जाहीर
शंभुराज देसाईंना झालेल्या धक्काबुक्कीबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एका कॅबिनेट मंत्र्याला मारहाण कशी केली जाते? या घटनेचा निषेधच आहे. हा देश डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने चालणार आहे, बाकी कोणाच्या मनमर्जीने चालणार नाही. या घटनेत पोलिसांची काहीही संबंध नाही. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांच्या मागे जी शक्ती होती ती अदृश्यशक्तीची ताकद आहे. महाराष्ट्रातील पोलीस असं करणारच नाहीत त्यांना हे करायला भाग पाडलं आहे, असा माझा विश्वास आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शंभुराज देसाईंना आणि मकरंद पाटलांना धक्काबुक्की झाली असेल तर या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. कारण हे दोघेही कॅबिनेट मंत्री आहे. तसेच ज्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री आहात तेच सरकार तुम्हाला धक्काबुक्की करत आहे, हे धक्कादायक आहे. पांडुरंगा, हे काय दिवस बघायला मिळत आहेत महाराष्ट्रात, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे करणार शंभूराज देसाईंना फोन?
पुढे त्या म्हणाल्या, मी मकरंद पाटलांना फोन करून सर्व माहिती घेतली आहे. आता मी शंभूराज देसाईंना देखील फोन करणार आहे. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत अशी गुंडागर्दी होणार असेल तर यापुढे सर्वांना ताकदीने लढण्याची आवश्यकता आहे. आज हा फक्त साताऱ्याचा विषय आहे मात्र, उद्या परच हाच प्रकार 10 ठिकाणी होऊ शकतो, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार आहे. हे महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे कारण असे प्रकार लोकशाहीत घडत आहे. साताऱ्यात झालेली घटना ही लोकशाहीची हत्या आहे. हा छोटा भाऊ आणि मोठा भाऊ असा विषय नाहीये, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.












