राज्यातील आणि केंद्रातील सरकार जेन झी पिढीच्या मुलांना का घाबरतंय? असा खोचक सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील मातोश्री या निवासस्थानावरून पत्रकार परिषद घेतली. एकीकडे जगभर १८ या उमेदीच्या वयातील मुलं रस्त्यावर उतरून क्रांती करत आहेत. त्यांना जगाने ‘जेन झी‘ असं नाव दिलं आहे. या जेन झी पिढीतील मुलांना हे सरकार का घाबरतंय?, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
या वेळी त्यांनी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. ते म्हणाले, “शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आपण सरकारशी दोन हात करू” तसेच त्यांनी मराठवाड्यात जाऊन शेतकऱ्यांना भेटणार असल्याचं जाहीर केलं. यासह त्यांनी दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की “सर्व मतदारांनी शिवसेनेच्या (उबाठा) जवळच्या शाखेत जाऊन मतदार याद्यांमध्ये तुमचं नाव आहे का? कोणी तुमचं नाव वगळलेलं नाही ना? तुमचा पत्ता बदललेला नाही ना? तुमचं वय, लिंग अथवा धर्म बदललेला नाही ना याची खात्री करा,“ असं आवाहन ठाकरे यांनी जनतेला केलं आहे,
‘जेन झी’ पिढीतील मुलांना हे सरकार का घाबरतंय?
“निवडणूक आयोगाने मतदारांसाठी १ जून ही कट ऑफ डेट ठेवली आहे. याचा अर्थ १ जून नंतर ज्या मुलांचं वय १८ वर्षे पूर्ण झालेलं असेल त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. या मुलांना त्यांचा मतदानाचा अधिकार वापरता येणार नाही. एकीकडे जगभर याच वयातील मुलं रस्त्यावर उतरून क्रांती करत आहेत. त्यांना जगाने जेन झी असं नाव दिलं आहे. या जेन झी पिढीतील मुलांना हे सरकार का घाबरतंय?, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
१ जुलैनंतर १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे
“लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आधी ४५ लाख बोगस मतदार महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये घुसवले. हे कोणी केलं? कसं केलं? हे अद्याप समजलेलं नाही. परंतु, याचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम झाला. आता १ जुलैनंतर १८ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना अधिकृतपणे मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, ती महाराष्ट्रातील तरुण मुलं व तरुणी मतदान करू शकत नाहीत. मी या मुलांनाही आवाहन करतो की, तुम्ही शिवसेनेच्या शाखेत येऊन तुमचं नाव नोंदवा. जेणेकरून आपल्याला कळेल की या सरकारने किती मुलांना मतदानापासून वंचित ठेवलं आहे.”
हे ही वाचा – संघर्ष अटळ! राज ठाकरेंचा व्होट जिहाद, भाजप नेत्यांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका
शेलारांनी आम्हाला फुलटॉस दिला- उद्धव ठाकरे
आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेवर उद्धव ठाकरे म्हणाले, “आशिष शेलार यांनी आम्हाला फुलटॉस चेंडू टाकला आहे. मुळात त्यांनी आमचा आरोप मान्य केला आहे. मतदार याद्यांमधील घोळ त्यांनी मान्य केले आहेत.” उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आशिषे शेलार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली
“शेलार व फडणवीसांमधील भांडणाचा परिपाक”
“मी आशिष शेलार यांनी नकळतपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे पप्पू ठरवलं आहे. सहसा भाजपात कोणी फडणवीसांविरोधात बोलण्याचं धाडस दाखवत नाही. परंतु, शेलार यांनी ते धाडस दाखवलं. कदाचित हा त्यांच्यातील अंतर्गत वाद असेल. आशिष शेलार यांन राज्यातील मतदार याद्या सदोष असल्याचं मान्य केलं. मुख्यमंत्री बिहारमध्ये निवडणुकीचा प्रचार करून, घसा कोरडा करून आलेले असतानाच शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना हे आरोपांचं अमृत पाजलंय.”











