Narendra Modi Jugaad : गटारातून गॅस आणि चहाची टपरी… पंतप्रधान मोदींच्या त्या विधानावरून सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा धुराळा देशात सध्या इंधन दरवाढ आणि एलपीजी गॅसच्या उपलब्धतेवरून चर्चा सुरू असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक जुने विधान सोशल मीडियावर पुन्हा एकदा तुफान व्हायरल झाले आहे. गटारातून निघणाऱ्या गॅसवर चहा बनवला जाऊ शकतो, या त्यांच्या विधानाचा संदर्भ देत विरोधकांनी आणि नेत्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सोशल मीडियावर या विधानाची प्रचंड खिल्ली उडवली जात असून ‘गटार गॅस’ हा शब्द पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये ‘जागतिक जैव इंधन दिना’निमित्त दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात भाषण केले होते. या भाषणात त्यांनी एका लहान शहरातील चहावाल्याचा किस्सा सांगितला होता. मोदी म्हणाले होते, एका छोट्या शहरात एका चहावाल्याच्या दुकानाशेजारी एक नाला वाहत होता. त्या चहावाल्याने एक छोटेसे भांडे उलटे करून त्या नाल्यावर ठेवले. त्या भांड्याला एक छिद्र पाडून त्यात पाईप जोडला आणि त्या पाईपचा दुसरा टोक आपल्या शेगडीला जोडला. गटारातून निघणाऱ्या घाण वायूचा वापर करून त्याने आपला चहा बनवला. पंतप्रधानांनी हे उदाहरण ‘इनोव्हेशन’ आणि ‘टाकाऊतून टिकाऊ’ या संकल्पनेच्या संदर्भात दिले होते. मात्र, तेव्हापासूनच हे विधान वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
हेही वाचा – ज्योती वाघमारेंसारखी गरीबी सर्वांना लाभो! ‘कोट’भर संपत्तीच्या मालकीण गरीब खासदार कशा?
सिलिंडर महाग झाले तरी काळजी नको, फक्त घराजवळ एखादे गटार शोधा
मार्च २०२६ मध्ये इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतात कच्च्या तेलाचे आणि गॅसचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच दरम्यान इंधनाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या परिस्थितीचा फायदा घेत विरोधकांनी मोदींच्या त्या जुन्या विधानाचे व्हिडिओ पुन्हा शेअर करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी यावर उपरोधिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता सिलिंडर महाग झाले तरी काळजी नको, फक्त घराजवळ एखादे गटार शोधा, अशा आशयाचे अनेक मेम्स व्हायरल होत आहेत. काही युजर्सनी तर चक्क पाईप आणि प्लास्टिकच्या बाटल्या वापरून गटारातून गॅस काढण्याचे काल्पनिक फोटो पोस्ट करून सरकारची फिरकी घेतली आहे.
सरकारने गॅस कनेक्शन देण्याऐवजी घरोघरी गटाराचे पाईप द्यावेत – संजय राऊत
या मुद्द्यावर राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी हे एक मोठे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी देशाला गॅस संकटातून वाचवण्याचा मार्ग आधीच सांगितला आहे. आता सरकारने गॅस कनेक्शन देण्याऐवजी घरोघरी गटाराचे पाईप द्यावेत. मुंबईत मिठी नदी आहे, तिथे तर गॅसचा मोठा साठा मिळेल.” दुसरीकडे, काँग्रेस नेत्यांनीही “पंतप्रधानांचे हे विज्ञान देशाला अधोगतीकडे नेणारे आहे,” अशी टीका केली आहे. विरोधकांच्या मते, अशा विधानांमुळे देशाच्या वैज्ञानिक प्रगतीचं जगात हसू होत आहे.
विज्ञानाच्या दृष्टिकोनातून गटारातून गॅस मिळवणे शक्य?
विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर, सांडपाणी किंवा गटारातील कचरा कुजल्यानंतर ‘मिथेन’ वायू तयार होतो. हा वायू ज्वलनशील असतो आणि बायोगॅस निर्मितीमध्ये याचाच वापर केला जातो. त्यामुळे तत्त्वतः गटारातून गॅस मिळवणे शक्य आहे. गटारातून निघणाऱ्या गॅसमध्ये मिथेनसोबतच हायड्रोजन सल्फाईड आणि कार्बन डायऑक्साइड यांसारखे इतर वायू असतात. पण योग्य दबाव आणि त्याचे शुद्धीकरण केल्याशिवाय तो थेट वापरणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. उघड्या गटारावर भांडे पालथे घालून चहा बनवणे हे एखाद्या छोट्या प्रयोगासाठी ठीक असू शकते, पण ते मोठ्या प्रमाणावर इंधन म्हणून वापरणे अशक्य आहे. त्यामुळेच आता नेटकऱ्यांकडून खिल्ली उडवली जातेय.
जनता सध्या विनोदाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त करताना दिसत
एकीकडे खिल्ली उडवली जात असताना, मोदी समर्थक मात्र या विधानाचा बचाव करत आहेत. त्यांच्या मते, पंतप्रधानांना फक्त हे सुचवायचे होते की आपण स्थानिक संसाधनांचा वापर करून ऊर्जा निर्माण करू शकतो. परंतु, गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य जनता सध्या विनोदाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त करताना दिसत आहे. एकूणच, “गटार गॅस” हा विषय आता केवळ वैज्ञानिक प्रयोगापुरता मर्यादित न राहता, तो एक राजकीय शस्त्र बनला आहे. इंधन टंचाईच्या काळात पंतप्रधानांच्या या विधानावरून सुरू असलेली ही खिल्ली सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे. पंतप्रधान मोदी यांचं हे पहिलंच विधान चर्चेत आलं नाही, याआधीही मोदींच्या अनेक विधानांची खिल्ली उडवली गेलीय.












