नेपाळनंतर आता मादागास्कर देशातही हिंसक Gen-Z निदर्शनांमुळं राजकीय उलथापालथ झाली आहे. या परिस्थितीमुळं हिंद महासागरात वसलेल्या या बेट राष्ट्रात सशस्त्र दलांनी सत्ता हाती घेतली आहे. मादागास्करमधील एका उच्चभ्रू लष्करी तुकडीच्या कर्नलनं ही माहिती उघड केली आहे. राष्ट्रपती अँड्री राजोएलिना यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्तावावर संसदेने मतदान केल्यानंतर लगेचच लष्करी कर्नलनं ही घोषणा केली.
राष्ट्रपती देश सोडून पळून गेले :
कर्नल मायकेल रँड्रियानिरिना यांनी पत्रकारांना सांगितलं की, सैन्य आणि निमलष्करी कायदा अंमलबजावणी दलातील अधिकाऱ्यांची एक परिषद स्थापन करेल. लवकरच नागरी सरकार स्थापन करण्यासाठी नवीन पंतप्रधान नियुक्त केला जाईल. Gen-Z चळवळ आणि मादागास्करमधील लष्करी बंडामुळं राष्ट्रपतींना आधीच देश सोडून पळून जाण्यास भाग पाडलं आहे. असं दिसतं की देशाच्या नेत्या म्हणून राजोएलिना यांचा सात वर्षांचा कार्यकाळ संपला आहे.
The military has taken control of Madagascar after President Andry Rajeolina fled the country to a ‘safe place’ in fear for his life.https://t.co/BtHbGPnS0B pic.twitter.com/lkFIT4uvnP
— Sky News (@SkyNews) October 14, 2025
Gen-Z निदर्शनांमध्ये सैन्य सामील :
शनिवारी निदर्शनांमध्ये लष्करी तुकडी सामील झाल्यानं मादागास्करमधील Gen-Z निदर्शनांमधील परिस्थिती आणखी बिकट झाली. निदर्शनांमध्ये लष्कराच्या सदस्यांनी अध्यक्ष आणि मंत्र्यांना पदावरुन हटण्याची मागणी केली. राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना देश सोडून गेले असलं तरी त्यांनी राजीनामा दिलेला नाही.
निषेध कशामुळं सुरु झालं? :
एका वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना यांना फ्रेंच लष्करी विमानातून देशाबाहेर काढण्यात आलं. फ्रेंच परराष्ट्र मंत्रालयानं या प्रकरणी कोणतेही निवेदन जारी केलेलं नाही. मादागास्कर ही पूर्वीची फ्रेंच वसाहत होती आणि राजोएलिना यांच्याकडे फ्रेंच नागरिकत्व असल्याचं वृत्त आहे, ज्यामुळं जनतेचा रोषही वाढला आहे. वारंवार पाणी आणि वीजपुरवठा खंडित झाल्यामुळं 25 सप्टेंबर रोजी सरकारविरोधी निदर्शनं सुरु झाली.