कोलंबो : महिला वनडे विश्वचषक 2025 सध्या श्रीलंका आणि भारतात खेळला जात आहे. 30 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत यापूर्वी चार सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियानं पहिला सामना जिंकला आहे आणि आता पुढच्या सामन्यात ते पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरतील. हा सामना कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही संघ तिथं पोहोचले असून जोरदार सराव करत आहेत. मात्र या सामन्यापूर्वी सर्वांना आश्चर्यचकित करणारी एक घटना घडली. भारतीय खेळाडू सराव करत असताना, चक्क सापानं मैदानात प्रवेश केला, ज्यामुळं सर्वांनाच धक्का बसला.
नेमकं काय घडलं :
वास्तविक 3 ऑक्टोबर रोजी भारतीय संघ कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये सराव करत होता. खेळाडू सेंटर विकेटवरुन बाहेर जात असताना अचानक मैदानावर एक साप दिसला. एका ग्राउंड स्टाफनं पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं की, हा तपकिरी साप विषारी नव्हता, तर तो गॅरांडिया प्रजातीचा होता, जो सहसा नाल्यांमध्ये फिरतो किंवा उंदरांच्या शोधात उभा राहतो. मात्र सापाला पाहून खेळाडू घाबरले नाहीत; त्याऐवजी सर्वजण हसत होते. याचा फोटो चांगलाच व्हायरल झाला
टीम इंडिया वरचढ :
रविवार 5 ऑक्टोबर हा दिवस 2025 च्या महिला वनडे विश्वचषकात खूप खास असेल. या दिवशी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ मैदानात उतरतील. सर्वांचं लक्ष या सामन्यावर केंद्रित असेल. ऐतिहासिकदृष्ट्या, भारतीय महिला संघ नेहमीच वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध वरचढ राहिला आहे. आकडेवारीवरुन असं दिसून येतं की दोन्ही संघांनी आतापर्यंत 11 वनडे सामने खेळले आहेत आणि ते सर्व भारतानं जिंकले आहेत.
दोन्ही संघांमधील दुसरा सामना :
भारतानं 2025 च्या वनडे विश्वचषकाची सुरुवात श्रीलंकेला पराभूत करत विजयानं केली, तर पाकिस्तानला त्यांच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशकडून 7 गडी राखून पराभव पत्करावा लागला. आता, दोन्ही संघ त्यांचा दुसरा सामना खेळतील.