वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल एक मोठा दावा केला आहे. ट्रम्प म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आश्वासन दिलं आहे की भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. त्यांनी मॉस्कोवर दबाव वाढवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमधील हे एक मोठं पाऊल असल्याचं वर्णन केलं. तसंच युक्रेन युद्धामुळं रशियाला वेगळं करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा हा एक भाग असल्याचं ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प काय म्हणाले? : व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे याबद्दल मला आनंद नव्हता, परंतु पंतप्रधान मोदींनी मला आश्वासन दिलं आहे की भारत आता असं करणार नाही.” याला एक मोठं पाऊल म्हणत ट्रम्प म्हणाले की आता आम्हाला चीनकडूनही अशीच अपेक्षा आहे.
ट्रम्प यांनी भारताला एक विश्वासार्ह भागीदार म्हटले :
ट्रम्प यांनी भारताला एक विश्वासार्ह भागीदार म्हणत म्हटलं की, “ते (पंतप्रधान नरेंद्र मोदी) माझे मित्र आहेत. आमचे खूप चांगले संबंध आहेत.” ते पुढं म्हणाले, “रशियाकडून तेल खरेदी करण्याबद्दल आम्हाला आनंद नव्हता कारण त्यामुळं रशियाला हे निरर्थक युद्ध सुरु ठेवता येईल ज्यामध्ये त्यानं 1,50,000 लोक, बहुतेक सैनिक गमावले आहेत.”
रशिया-युक्रेन युद्धाबद्दल ट्रम्प काय म्हणाले? :
रशिया आणि युक्रेनमधील सुरु असलेल्या युद्धाबाबत ट्रम्प म्हणाले, “हे असं युद्ध आहे जे कधीही सुरु व्हायला नको होते, परंतु हे असं युद्ध आहे जे रशियाने पहिल्या आठवड्यात जिंकायला हवं होतं आणि ते चौथ्या वर्षात प्रवेश करत आहेत. मला ते थांबलेलं पहायचं आहे. म्हणूनच भारत तेल खरेदी करत आहे याबद्दल मला आनंद नव्हता.” ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिका पाश्चात्य निर्बंध प्रभावी व्हावेत आणि रशियाच्या लष्कराला निधी मिळू नये यासाठी दबाव वाढवत आहे.
भारतानं आपली भूमिका केली स्पष्ट :
भारतानं आधीच स्पष्ट केलं आहे की रशियाकडून तेल खरेदी करणं त्यांच्या उर्जेच्या गरजांवर आधारित आहे. अमेरिकेनं वारंवार भारतावर रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. भारतावर 50% कर हे त्याचं एक उदाहरण आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यापूर्वी म्हटलं आहे की भारताची ऊर्जा खरेदी राष्ट्रीय हिताच्या आधारे केली जाते. “आम्ही राजकीय विचारांवर आधारित कोणत्याही देशाकडून आयात करत नाही. आमचे निर्णय बाजारातील वास्तवाच्या आधारे घेतले जातात.” भारत असंही म्हणतो की त्याची आयात रशियन तेलावर G7 नं निश्चित केलेल्या किंमत मर्यादेनुसार आहे आणि ते सर्व आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन करून देशांतर्गत ऊर्जेच्या गरजा पूर्ण करत आहे.