गेल्या काही दिवसांपासून विद्येचे माहेघर असलेल्या पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी आयुष कोमकर या तरुणाचा खून केल्याची घटना उघड झाली होती. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे.
पुण्यातील कोथरूड भागात काल मध्यरात्री फायरिंग झाल्याची घटना घडली आहे. हे फायरिंग निलेश घायवळ गँगच्या सदस्यांनी केले आहे. केवळ रस्ता न दिल्याच्या किरकोळ वादातून ही दहशत माजवण्यात आली असून गुरुवारी उशिरा रात्री घडलेल्या या घटनेत एक राऊंड फायर करण्यात आले. त्यामुळे आता पुणे शहर पुन्हा एकदा गँगवारच्या छायेत थरारल्याचे पाहायला मिळत आहे.
या फायरिंग मध्ये प्रकाश धुमाळ नावाचा युवक गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर सध्या सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोथरूडमधील चौकात ‘रस्ता न दिल्याचा’ वाद चिघळला आणि याच वादातून आरोपी मयूर कुंभारे याने थेट गोळीबार केला, या गोळीबारात धुमाळ यांच्या मांडीवर गोळी लागली. धुमाळ यांना रूग्णालयात हलविण्यात आले.
या प्रकरणात मयूर कुंभारे, आनंद चांडलेकर, गणेश राऊत, मोंटी व्यास, रोहित आखाडे आणि दिनेश पाठक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर सर्व आरोपी पसार झाले होते. परंतु, मयूर कुंभारे आणि आनंद चांडलेकर हे या दोघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी कोथरूड पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे आणि बाकी आरोपींचा तपास सुरू आहे.
या प्रकरणावरून पुण्यात नक्की चाललय तरी काय असा प्रश्न सातत्याने उपस्थित राहत आहे. पुण्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस काय करत आहे हा प्रश्न यावरून उपस्थित होतो. सुव्यवस्था धाब्यावर बसल्याच या घटनेत पाहायला मिळत आहे.