मुंबई– बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट म्हणजे बेस्ट या उपक्रमासाठी महाव्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या महाव्यवस्थापक पदी महाराष्ट्र सरकारने आयएएस अधिकारी सोनिया सेठी यांची नियुक्ती केली आहे. तसेच याठिकाणी कुर्ला बस अपघातात सात जणांचा मृत्यू झाला होता आणि ४० जण जखमी झाले होते. त्यानंतर पहिल्यांदा या महाव्यवस्थापक पदावर पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे.
मागील वर्षी डिसेंबर मध्ये 56 वर्षीय बेस्टचे (बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट) महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर या पदाचा कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आला होता. आता या पदावर पूर्णवेळ महाव्यस्थापक नियुक्त केल्याची माहिती उघड झाली आहे.
यापूर्वी या पदावर हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली होती परंतु एका दिवसातच नियुक्ती रद्द करण्यात आली. त्यानंतर, वरिष्ठ बीएमसी अधिकारी अश्विनी जोशी तर त्यानंतर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे विशेष कर्तव्य अधिकारी (ओएसडी) एसव्हीआर श्रीनिवास यांना अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. श्रीनिवास यांच्या निवृत्तीनंतर, जीएसटी आयुक्त आशीष शर्मा यांनी अंतरिम आधारावर ही भूमिका सांभाळली होती.
बेस्टच्या आर्थिक आव्हानांमुळे आयएएस अधिकारी हे पद स्वीकारण्यास टाळाटाळ करत असल्याचे मत राज्य सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. बेस्टने वाहतूक आणि वीज पुरवठा विभागांसाठी एकूण 9 हजार 283 कोटींपेक्षा जास्त एकत्रित दायित्व जाहीर केले असल्याची माहिती मिळाली आहे. बेस्ट हा उपक्रम 2 हजार 783 बसेस तर 875 इलेक्ट्रिक वाहने चालवतात. तर काही बसेस वेट लीज करारांखाली आहे.
कोण आहे सोनिया सेठी
सोनिया सेठी या महाराष्ट्राच्या आयएएस अधिकारी आहे. 1994 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी सोनिया सेठी या यापूर्वी राज्य सरकारच्या मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या जागी राज्य सरकारने आता विनिता वेद-सिंगल यांची मदत, पुनर्वसन विभागाच्या नवीन प्रधान सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.