• Home
  • महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजीनगर येथे गॅंगवॉर; पाण्याच्या टाकीत लपून बसलेल्या एकासह 7 आरोपींना अटक
Top News

छत्रपती संभाजीनगर येथे गॅंगवॉर; पाण्याच्या टाकीत लपून बसलेल्या एकासह 7 आरोपींना अटक

Gang War in Chhatrapati Sambhajinagar

Gang War in Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर येथे मोबाइल आणि मुलीच्या वादातून कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये गँगवॉर उफाळून आल्याचे चित्र पाहायला मिळाले. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 7 आरोपींना ताब्यात घेतले आहे.

काय आहे प्रकरण

छत्रपती संभाजीनगर येथे मुकुंदवाडी परिसरातील रेल्वे स्टेशन भागात सराईत गुन्हेगारांनी थेट गोळीबार करत एका तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न केला. मोबाईल आणि मुलीच्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. यावेळी आरोपींनी घरावर दगडफेक केली असून याप्रकरणात मध्यस्थी करून मिटवण्याचा प्रयत्न करत असलेल्या नागरिकांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

7 आरोपींना अटक

याप्रकरणी पोलिसांच्या पथकाने शुभम जाटसह सात आरोपींना अटक केली आहे. अवघ्या पाच तासांत पोलिसांनी ही कारवाई पूर्ण केली. या संपूर्ण घटनेनंतर पुंडलिकनगरचे पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, उपनिरीक्षक अर्जुन राऊत, सुनील म्हस्के, अंमलदार प्रकाश डोंगरे, शिवाजी शिंदे, संदीप बीडकर, अजय कांबळे, मुकुंदवाडीचे उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे, नरसिंग पवार आदींनी ही कारवाई केली.

पाण्याच्या टाकीत लपून बसला होता हल्लेखोर

पोलिसांच्या पथकाने बीड बायपास परिसरात जाऊन शुभम जाटचे घर गाठले. याठिकाणी हल्लेखोर असल्याने पथकाने घराला घेराव घातला. यावेळी काही हल्लेखोरांनी गच्चीवरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या हल्लेखोरांपैकी मयूर संजय उनगे, शिवा रमेश भालेराव, गोल्या उर्फ विजय दिनकर धनई, मनोज संजय पडूळ, सागर राऊत, अमर उर्फ अतुल पवार यांना पकडले. परंतु यात शुभम जाट सापडला नाही. याबाबत त्याच्या आईला विचारले असता तो रेल्वेरुळाच्या दिशेने पळाल्याचे आईने सांगितले. परंतु ती खोटे बोलत असल्याचे लक्षात आल्यानंतर निरीक्षक भंडारे, अर्जुन राऊत यांनी गच्चीवरील पाण्याच्या टाक्या तपासण्यास सुरुवात केली. त्यावेळी पाण्याच्या एका टाकीत शुभम सापडला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts