नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतून मोठी बातमी येत आहे. मंगळवारी दुपारी राष्ट्रपती भवनाच्या गेट क्रमांक 31 जवळील एका इमारतीत आग लागली. आगीची बातमी मिळताच खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीनं घटनास्थळी पाठवण्यात आल्या. दिल्ली अग्निशमन सेवेच्या (DFS) अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
20 मिनिटांत आग आटोक्यात
डीएफएसच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, दुमजली इमारतीच्या तळमजल्यावरील घरगुती वस्तूंना आग लागली. ही घटना दुपारी 1:51 वाजता कळवण्यात आली. 20 मिनिटांत आग आटोक्यात आणण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. “आम्ही घटनास्थळी पाच अग्निशमन गाड्या पाठवल्या. दुपारी 2:15 वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली,” असं डीएफएसच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.
मोहन गार्डन परिसरात आग
पश्चिम दिल्लीतील मोहन गार्डन परिसरातही आग लागली. दिवाळीच्या रात्री एका चार मजली निवासी इमारतीला आग लागली. तथापि, घटनेनंतर सात जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. मोहन गार्डनमधील एका घरात आग लागल्याची माहिती पीसीआरला रात्री 9:49 वाजता मिळाली.
सात जणांना वाचवण्यात आलं
पोलीस उपायुक्त (द्वारका) अंकित सिंह म्हणाले, “इमारतीतून तीन कुटुंबातील एकूण सात जणांना वाचवण्यात आलं. त्यापैकी चार जणांना स्थानिक पोलिसांनी जवळच्या रहिवाशांच्या मदतीनं अग्निशमन दलाच्या जवानांच्या आगमनापर्यंत दोरीचा वापर करुन वाचवलं.” त्यांनी सांगितलं की, उर्वरित तीन जणांना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घराबाहेर काढले. डीसीपी म्हणाले की, बचावलेल्यांमध्ये हरविंदर सिंग (34), त्यांची पत्नी प्रिया (27), वीरेंद्र सिंग (32), त्यांची पत्नी प्रेमवदा, राखी कुमारी (40) आणि त्यांची मुले वैष्णवी सिन्हा (15) आणि कृष्णा सिन्हा (10) यांचा समावेश आहे. सर्वजण सुरक्षित बचावले.