आज दिवाळीच्या निमित्ताने सारसबागेत दिवाळी पाडवा या कार्यक्रमाचे आयोजन पहाटेच्या सुमारास करण्यात आले होते. परंतु कार्यक्रमावेळी दोन गटात राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे कार्यक्रमस्थळी तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले. वातावरण शांत करण्यासाठी पोलिसांनी मध्यस्ती केली. त्यानंतर हे प्रकरण मिटले.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सारसबाग परिसरात दिवाळी पहाटच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या कार्यक्रमाला गालबोट लागल्याची घटना निदर्शनास आली. याठिकाणी धक्का लागल्याच्या कारणावरुन दोन गटांमध्ये वाद झाला. आणि या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या दोन्ही गटातील मुलं एकमेकांवर धावून गेली. आणि त्यांच्यात राडा झाला. हा वाद चिघळण्यापूर्वी सारसबागेत तैनात असलेल्या पोलीसांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. आणि यामुळे पुढील अनर्थ टळला.
पुण्यात दिवाळी पाडव्यानिमित्त दरवर्षी सारसबाग येथे दिवाळी पहाट चे आयोजन करण्यात येते. यंदाही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी तरुण तरुणाई यांची मोठ्या संख्येने उपस्थिती बघायला मिळाली. पहाटे ३ वाजल्यापासून सारस बागेतील तळ्यातील गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आणि दिवाळी पहाट या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती. तरुणाई पारंपरिक वेशभूषा करून कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आल्या होत्या.
सारस बाग येथे दरवर्षी होणारा दिवाळी पहाट हा कार्यक्रम २८ वर्षांपासून आयोजित करण्यात येतो. परंतु यंदा या कार्यक्रमाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध दर्शवला होता. त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावण्याच्या धमक्या दिल्या होत्या. या धमक्यांना कंटाळून आयोजकांनी दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला परंतु पुणे पोलिसांनी कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यात येण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या एका घटनेशिवाय दिवाळी पहाट कार्यक्रमात कोणतीही अडचण आली नाही. आणि हा कार्यक्रम सुरळीत पार पडला.