राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निडणूकीचा प्रचार आता जोमात सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोपाचे सत्र चालू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने मतदारांने धमकी देण्याचे सत्र सुरू केला आहे. कागल नगरपालिका निवडणुकीमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे एकत्र आल्यानंतर कोल्हापूरमध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कागल नगरपालिका निवडणुकीसाठी जागावाटप झाल्यानंतर प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. प्रचारामध्ये आता हसन मुश्रीफ यांनी अजितदादा पवार स्टाईलने मतदारांना धमकी वजा इशारा देण्यास सुरुवात केली आहे. मुश्रीफ यांनी ज्या वाॅर्डमध्ये मते कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवा, आपलं काही खरं नाही अशा शब्दात धमकी वजा इशारा दिला. कोणीही निगेटिव्ह चर्चा केली आणि तसं कळलं तर त्यांचे खैर केली जाणार नाही, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला.
नेत्यांनी घेतलेला निर्णय पटो किंवा न पटो, पण मान्य करायचा
हसन मुश्रीफ पुढे म्हणाले की, उमेदवार बाहेरच्या वाॅर्डातील आहे म्हणून कोणी दुर्लक्ष करू नका. घराजवळचा उमेदवार आहे म्हणून तुमच्या घरात सोन्याच्या खापऱ्या घालणार आहे का? अशी सुद्धा विचारणा मुश्रीफ यांनी यावेळी केली. नेतेमंडळी ज्यावेळी एकत्र येण्याचा निर्णय घेतात त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्याची अंमलबजावणी करायची असते. नेत्यांनी घेतलेला निर्णय पटो किंवा न पटो, पण मान्य करायचा असतो असं सुद्धा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. समरजितसिंह साहेब आपल्या सोबत असल्यामुळे माझ्या धमकीला मर्यादा येणार आहेत. दोघे भांडत बसलो तर आपलं महत्त्व राहिलं असतं आपल्याला पैसे मिळाले असते, कुणीतरी विचारलं असतं, म्हणून काही लोक असा समज करत करतील असेही ते म्हणाले.
हेही वाचा – अर्थमंत्र्यांची मतदारांना थेट ऑफर! अर्थ खातं माझ्याकडे, मत द्या अन् निधी घ्या..
तुम्ही तिथे काठ मारली तर मी पण काठ मारणार- अजित पवार
“आम्ही ज्या अठरा लोकांचे पॅनल उभं केलं आहे त्यांना निवडून द्या. मी काय साधू संत नाही. तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला विकासाची काम करून देतो. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि चौदाशे कोटी रुपयांचा निधी माझ्याकडे आहे. कोणी संपत नसतं त्यामुळे संकुचित विचार ठेवू नका, मन मोठं करा. तुम्ही मला अठराच्या अठरा उमेदवार निवडून दिले तर तुम्ही सांगितलेलं सगळं द्यायला मी तयार आहे. पण तुम्ही तिथे काठ मारली तर मी पण काठ मारणार. तुमच्या हातामध्ये मत द्यायचं आहे माझ्या हातात निधी द्यायचा आहे. मग बघा काय ते. सर्वसामान्य बारामतीकर माझ्याबरोबर आहे,” असा धमकी वजा इशारा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत दिला होता. त्यानंतर आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी तोच पाढा गिरवला आहे.
कोणीला बोलवून तंबी द्यायला लावू नका, सांगायला लावू नका
कागल मध्ये दोन-तीन वाॅर्डात परिस्थिती टाईट करण्याची गरज आहे. दोन गट एकत्र आले आहेत. त्यामुळे राज्यभर याची चर्चा होणार आहे. राजेंची तर होईलच, पण मी मंत्री असल्यामुळे माझी जास्त चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्र्याची अब्रू राखायची की घालवायची हे तुमच्या हातात आहे. आमच्या मागे निवडणुकीच्या प्रचाराचं इतकं मोठं काम लागलंय की कार्यकर्त्यांच्या लग्नाला जायला वेळ मिळत नाही. कार्यकर्त्यांनी नंतर गोंधळाला बोलवाव, जेवायला नक्की येईन असेही त्यांनी सांगितल. आमच्या युतीची बातमी आधीच फुटल्याने त्यामुळे जादा फॉर्म राहिले. गैरसमज करणारे गैरसमज करून जातील. मात्र, तुमचे भविष्य संकटात येणार असल्याचा इशारा सुद्धा हसन मुश्रीफ यांनी दिला. आता सैनिकासारखं काम करा, कोणीला बोलवून तंबी द्यायला लावू नका, सांगायला लावू नका असेही हसन मुश्रीफ म्हणाले.












