Pratap Sarnaik on MLA Mehta : मीरा भाईंदर येथे 11 तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार याची माहिती देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या कथित गुन्हेगारी आणि भ्रष्ट कारभारावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी जाहीर सभेत एकप्रकारे “पाढाच वाचला”. स्वतःच्या राजकीय आणि वैयक्तिक फायद्यासाठी आमदार नरेंद्र मेहता मीरा-भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत असल्याचा गंभीर आरोप सरनाईक यांनी केला.
नरेंद्र मेहता कारणीभूत
शहरातील महत्त्वाचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असून पाणीटंचाई आणि मेट्रो प्रकल्प रखडण्यामागे फक्त आणि फक्त आमदार नरेंद्र मेहता कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी लगावला. खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही निर्देश आमदार मेहता धुडकावत असल्याचे दिसून येत असल्याचे सरनाईक म्हणाले.
हे ही वाचा : मनसेला शिवडी मध्ये धक्का; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे कट्टर समर्थक यांचा पक्षाला “जय महाराष्ट्र”
आम्ही युतीत आहोत
आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार असून, “आम्ही युतीत आहोत, देवेंद्र फडणवीस हे आमचे मुख्य नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या सभेचे स्वागत आम्ही पूर्ण ताकदीने करणार,” असे स्पष्ट करत सरनाईक यांनी युतीतील भूमिका अधोरेखित केली. तसेच येत्या 11 तारखेला याच ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. गौमातेला राजकीय दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताम्रपत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली.
शहराचा विकास ठप्प झाल्याचा आरोप
दरम्यान, मीरा-भाईंदर शहराच्या विकासाला खीळ घालणाऱ्या निर्णयांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, आमदार नरेंद्र मेहता यांच्या भूमिकेमुळे शहराचा विकास ठप्प झाल्याचा आरोप आता उघडपणे केला जात आहे. आगामी सभांच्या पार्श्वभूमीवर हे आरोप शहराच्या राजकारणात नवे वळण देणारे ठरणार असल्याचे बोलले जात आहे.












